पुणे; पुढारी वृत्तसेवा: शैक्षणिक वर्ष 2022-23च्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) उपलब्ध असल्यास विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील.
परंतु, अर्ज भरतेवेळी हे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा; तसेच विविध कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने जाहीर केल्या आहेत. दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला; परंतु मंडळाकडून गुणपत्रके प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाइन अर्ज भरून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. मूळ गुणपत्रक मिळण्यास विलंब होणार असल्यास संबंधित परीक्षा मंडळाकडून ऑनलाइन प्राप्त झालेली गुणपत्रके ग्राह्य समजण्यात येतील.
कोणती कागदपत्रे सादर करावीत?
सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला अद्याप मिळाला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला ग्राह्य धरता येईल. ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेऊ इच्छिणार्या पात्र विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. व्हीजे-एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे 'नॉन- क्रिमिलेअर' प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.