नीलेश झेंडे
दिवे : पुरंदर तालुक्यातील दिवे गावातील जाधववाडी येथील अजित आणि सुनील जाधव यांच्या बागेतील एका पेरूचे वजन नऊशे ग्रॅम ते अगदी एक किलोपर्यंत आहे. सात गुंठे क्षेत्रावर आत्तापर्यंत तब्बल तीन टनांपर्यंत उत्पादन मिळाले असून, अजून तीन टनांपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आहे, असे जाधव बंधूंनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील दिवे गाव हे फळबागांचे आगार म्हणून अग्रेसर ठरत आहे. येथे अनेक शेतकरी अंजीर सीताफळ, पेरूचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. जाधववाडीमधील अजित जाधव आणि सुनील जाधव या दोन्ही भावांनी आपल्या पेरू बागेमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या त्यांची प्रयोगशील पेरू बाग परिसरातील शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जाधव बंधूंनी आपल्या सात गुंठे क्षेत्रावर छत्तीसगड व्ही.आर.एन या जातीची लागवड केली. सुरवातीलाच जेसीबीच्या साहाय्याने खड्डे घेऊन त्यात शेणखत, बुरशीनाशकाचा वापर करून पेरूची लागवड केली. लागवडीनंतर दोनच वर्षात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरवात झाली. पेरूला सुरुवातीलाच माशीचा प्रादुर्भाव जास्त होता आणि याच रोगामुळे परिसरातील पेरू बागा शेतकर्यांनी काढून टाकल्या आहेत. जाधव बंधूंनी मात्र कल्पकतेचा वापर केला. फळधारणा झाल्यानंतर साधारण लिंबाच्या आकाराचे फळ झाल्यानंतर प्रत्येक फळाला प्लॅस्टिकच्या आवरणाचा वापर केला जातो, ज्याला फम पॅकिंग म्हटले जाते, यामुळे माशीने फळांवर कितीही डंख मारला तरी तो फळापर्यंत पोहचत नाही. जाधव बंधूंच्या या कल्पकतेने पेरूचे दर्जेदार उत्पादन निघत आहे.
पेरूचे वजन आणि चमकदारपणामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एका कॅरेटमध्ये अवघे अठरा ते वीस पेरू बसत असून खर्च वजा एका कॅरेटचे एक हजार रुपये हातात पडत आहेत. एक पेरू पन्नास ते साठ रुपये दरम्यान विकला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रासायनिक खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, त्यामुळे शेती करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून फक्त शेणखताचा वापर केला जात असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे आणि पेरूचा रंग, आकार, चव अप्रतिम आहे. या सर्व कामात जाधव बंधूंना आई मंदाकिनी जाधव, भावजय व मुले मदत करत आहेत.