पुणे

उद्योग क्षेत्रातील 200 प्रशिक्षक घडविणार; चिंचवड एमआयडीसीमध्ये मोफत प्रशिक्षण

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: उद्योग क्षेत्रातील 200 प्रशिक्षक घडविण्याच्या उद्देशाने चिंचवड एमआयडीसीमधील इंजिनिअरिंग क्लस्टर येथे मोफ त प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिलची नेमणूक केली आहे, अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला अ‍ॅटोमोटिव्ह स्कील डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी, इंजिनियरिंग क्लस्टरचे (पुणे) संचालक सागर शिंदे, व्यावसायिक प्रशिक्षण सल्लागार अमर पाटील, ईसाबेल थेनिन्जर आदी उपस्थित होते.

जेसलशाफ्ट फॉर इंटरनॅशनल झुसमेनार्बेट (जीआयझेड) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सीएनसी प्रोग्रामिंग अ‍ॅण्ड ऑपरेशन, अ‍ॅडव्हान्स वेल्डिंग टेक्नॉलॉजी, रोबोटिक टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ऑपरेशन, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, अ‍ॅडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, सीएनसी मशीन संबंधित क्षेत्रात कार्यरत प्रशिक्षकांना या उपक्रमाचा फायदा घेता येणार आहे. आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, खासगी संस्था यामध्ये काम करत असलेल्या प्रशिक्षकांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होता येईल. त्याशिवाय, कुशल तंत्रज्ञ, उद्योगांमधून निवृत्त झालेले तंत्रज्ञ, तांत्रिक सल्लागार यांना सीएनसी मशिन प्रशिक्षणात प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या जर्मन ड्युएल वेट मॉडेलवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी मिळणार आहे.

हा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योजकांच्या सहभागातून तयार केला आहे. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एकूण 11 आठवड्यांचा हा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये 4 आठवडे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश असणार आहे. ड्युएल वेट जर्मन मॉडेलवर आधारित या कार्यक्रमात जर्मन मास्टर ट्रेनरचे देखील आठवडाभरासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान 10 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींना ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिल तसेच इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स असे 2 प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबत 12 जुलै रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत चिंचवड एमआयडीसीतील प्लॉट नंबर 51, डी 1 ब्लॉक येथील इंजिनियरिंग क्लस्टरमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

SCROLL FOR NEXT