उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: आदमापूरचे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची मुक्या प्राण्यांची पालखी व मेंढ्यांचा कळप शिर्सुफळमध्ये दाखल झाला आहे. त्यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मेंढ्यांना व पालखीला आपल्या घराजवळ आसरा दिल्यास पीक उत्तमरीत्या येते. घरातील आर्थिक स्थिती सुधारून दुष्ट शक्तींचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिर्सुफळ येथे सदगुरू बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप क्रमांक 9 दाखल झाला आहे.
सद्गुरू बाळूमामांच्या मेंढ्यांचे एकूण 18 कळप असून, कळपाचे दिंडीचालक आप्पा माळी पालखीचे सर्व नियोजन पाहतात. बुधवारी (दि. 17) रोजी दुपारी 4 च्या सुमारास रावणगावमधून वाजतगाजत शिर्सुफळमध्ये पालखी दाखल झाली. या वेळी गावकर्यांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. तसेच, बाळूमामाच्या मेंढ्या शेतात चारण्यासाठी लोकही मोठे उत्सुक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवारी पुढील गाव जिरेगावला पालखी रवाना होणार असल्याची माहिती आप्पा माळी यांनी दिली.