सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील एकूण 1 लाख 10 हजार 207 खातेदारांपैकी 49 हजार 580 खातेदारांनी (45 टक्के) ई पीक पाहणीद्वारे आपल्या बांधावर बसून सातबार्यावर पिके नोंदवली आहेत. खरीप ई पीक पाहणी नोंदणी आता 1 ऑगस्टपासून सुधारित अॅप्लिकेशनद्वारे होणार आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. पुरंदर तालुक्यात 32 हजार 500 खातेदार दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे तर 77 हजार 707 खातेदार दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले आहेत.
पीकविमास कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी ई पीक पाहणीत नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. खरीप हंगामामधील पेरण्या काही भागात पूर्ण तर काही भागात अद्याप सुरू आहेत. काही पिके फुलधारणेच्या अवस्थेत आहेत. पूर्ण झालेल्या पेरण्यांना अधिक पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी पीकविमा संरक्षण घेणे महत्त्वाचे आहे. पीकविमा उतरविण्याची अखेरची तारीख 31 जुलै आहे, असेही सांगितले आहे. सातबार्यावर ई पीक पाहणी नोंद असेल, तरच पुढील सर्व योजनांसाठी खातेदार ग्राह्य धरला जाईल, असे सांगितले आहे.
ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही. शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारेही पीकविमा योजनेत सहभाग घेऊ शकतात. मात्र 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीतही पिकांची नोंद करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
शेतकर्यांमध्ये माहितीचा अभाव
तालुक्यातील अनेक शेतकरी मोबाईल किंवा इंटरनेट हाताळणीबद्दल अनभिज्ञ आहेत. काही भागांमध्ये वाड्या-वस्त्यांवर किंवा गावांमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्यानेही ई पीक पाहणी योजनेस गती मिळत नसल्याचे दिसत आहे. काही शेतकर्यांकडे स्मार्टफोन नसल्यानेही अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावांत विशेष मोहिमेद्वारे ई पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे.