पुणे

इंद्रायणी नदीपात्रात फेसयुक्त पाणी

अमृता चौगुले

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशी, डुडुळगाव व आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात फेसयुक्त पाणी येत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी भागातील कंपन्यामधून निघणारे केमिकल मिश्रीत पाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे. यामुळे नदी प्रदूषणात वाढ होत आहे.

साधारण वडगाव मावळ एमआयडीसीपासून पुढे नदी प्रदूषणात वाढ होताना दिसून येत असून, कुदळवाडी भागातून सर्वांधिक सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे.हरगुडेवस्ती भागातून वाहत येणारा ओढा हा थेट नदीत मिसळत असल्याने प्रदूषीत पाणी वाढले आहे. मात्र याचा त्रास पुढे मोई, कुरुळी,चिंबळी, मोशी, डुडुळगाव, आळंदी, केळगाव आदी गावांना होत आहे.

येथील शेतीलादेखील हेच फेसयुक्त पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील व्यापक कारवाई करताना दिसत नाही. सध्या इंद्रायणी नदीची पाणी पातळी घटली आहे. जूनचा पंधरवडा संपत आला तरी मान्सून बरसलेला नाही. यामुळे नदीत सध्या फक्त सांडपाणीच वाहत आहे. पाण्याबरोबर जलपर्णीदेखील वाहून येत असून डुडुळगाव नजीक मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा ढीग साचलेला दिसत आहे.

पिंपरी चिंचचड पालिकेच्यावतीने या ठिकाणी जेसीबीच्या सहायाने जलपर्णी पात्राबाहेर काढण्याचे काम करण्यात येत आहे.
यामुळे नदीचे पाणी गढूळ होत असून, हेच पाणी पुढे वाहते होत आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीचे प्रदूषणाचे वाढते प्रमाणात चिंताजनक असून नागरिकांना नदी प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर नदी मिसळणारे दुषित पाणी थांबविण्याची मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT