जावेद मुलाणी
इंदापूर : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर राज्यमंत्रिपदावरून नुकतेच पायउतार व्हावे लागलेले व त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे वीस वर्षे मंत्री राहिलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात सत्तांतरानंतर प्रथमच विकासकामांच्या निधीवरून चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला. निमित्त होते संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील गोतोंडी (ता. इंदापूर) येथील वृक्षारोपणाचे. यावेळी सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला येत नाही. सत्ता येते-जाते, खुर्ची मिळते-जाते, मिळालेल्या पदाचा विकासासाठी उपयोग करून घ्यायचा असतो… ही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भाषणातील वाक्ये पुन्हा ऐकायला मिळाली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सुरुवातीलाच इंदापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पालखी महामार्गाला केंद्राकडूनच सर्वाधिक निधी मिळत असल्याचे आवर्जून सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तालुक्यात अधिकचा निधी आणण्यास कसलीही अडचण येणार नाही. भविष्यात इंदापूरसाठी निधी आणण्यात आमचाच पुढाकार असणार, असे सांगत सुरू असणारी कामे दर्जेदार व्हावीत, नाहीतर थेट गडकरी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रार केली जाईल. ही तक्रार महागात पडेल, गय केली जाणार नाही, असे म्हणत त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकारीवर्गाला गर्भित इशारा दिला.
पालखी महामार्गावर कामांच्या उणिवांचा पाढा वाचत केंद्र व राज्यात आम्हीच सत्तेत आहोत, त्याची जाणीव करून दिली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या खोचक टोल्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदेखील चांगलाच पलटवार करीत, मी सत्तेवरून पायउतार झालो असलो, तरी तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे तालुक्याला विकास निधीची कमतरता भासू देणार नाही. इंदापूर तालुक्यातील एक किलोमीटरचा रस्तादेखील करण्याचे काम शिल्लक ठेवणार नाही. सत्ता गेली तरी निधी कसा आणायचा, याची मला चांगली माहिती आहे.
योजना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री नितीन गडकरी यांची असो किंवा राज्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असो किंवा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असो; त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचवायच्या, हे मला माहीत आहे. काम करायचीदेखील धमक आणि तळमळ लागते. मंत्रिपद हे फक्त मिरवायला, रुबाब करायला नसते. उजनीचा पाणी प्रश्न असो किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, हे सोडविण्याचे भाग्य मला इंदापूर तालुक्यातील जनतेमुळे लाभले, यात मी नशीबवान समजतो. पाटील, भरणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व टीकांची झोड अपरोक्ष उडवत असत. परंतु, आज मात्र त्यांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावत समोरासमोरच एकमेकांचा समाचार घेतला.