पुणे

इंदापूर : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकाराचा मृत्यू

अमृता चौगुले

इंदापूर : निमगाव केतकी नजीक सोनमाथा परिसरातील वनीकरणात शनिवारी (दि. 18) दुपारी चार वाजता मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिंकारा हरणाचा मृत्यू झाला. कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकाराचा मृत्यू होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना घडल्याने निसर्गप्रेमींनी तीव— संताप व्यक्त केला. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चिंकारावर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर रामदास भोंग यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. चार-पाच भटक्या कुत्र्यांनी चिंकारा हरणाला जखमी केल्याची माहिती भोंग यांनी तातडीने फ—ेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना दिली. अ‍ॅड. सचिन राऊत, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी पथकासह घटनास्थळी आले.

चिंकारास उपचारासाठी इंदापूर येथे नेण्यात आले. मात्र, जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. चिंकारा हरीण अडीच वर्षे वयाचे नर वर्गातील होते. दरम्यान, दि. 12 जून रोजी देखील सोनमाथा परिसरात उत्तम गणपत भोंग यांच्या शेतात तीन वर्षे वयाच्या मादी वर्गातील चिंकारा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. एकाच आठवड्यात दोन चिंकारांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पयार्वरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी फ—ेंड्स ऑफ नेचर क्लबने वन विभागाकडे केली आहे.

SCROLL FOR NEXT