पुणे

इंदापूर तालुक्यात ऊस लागवडीस वेग

अमृता चौगुले

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा: पावसाने उघडीप दिल्याने इंदापूर तालुक्यात उसाच्या लागवडींना वेग आला आहे. इंदापूर तालुक्याच्या बागायती पट्ट्यातील उजनी लाभक्षेत्रात धरणाची पाणीपातळी मायनसमध्ये गेल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. जून महिन्यात पाऊस वेळेवर सुरू न झाल्याने नवीन ऊस लागवडी थांबल्या होत्या. परंतु, जुलै महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे ऊस लागवडीला वेग आला आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभीच पुणे जिल्हा परिसरात तसेच घाटमाथ्यावर पावसाचे आगमन झाले.

भामा, खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने उजनी जलाशयातील पाणीसाठा अवघ्या आठ ते दहा दिवसांत मायनसवरून 65 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे उजनी धरण लाभक्षेत्रातील थांबलेली ऊस लागवडी पुन्हा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उजनी धरणाचा पाणीसाठा 100 टक्के होण्याची खात्री शेतकर्‍यांना असल्याने इंदापूर तालुक्यात तसेच धरणाच्या लाभक्षेत्रात उसाच्या लागवडीने वेग घेतल्याचे चित्र आहे. उसाच्या क्षेत्रात तालुक्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

SCROLL FOR NEXT