पुणे

इंदापुरात झाड अंगावर पडून वन कर्मचार्‍याचा मृत्यू

अमृता चौगुले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेचे वटलेले झाड तोडत असताना ते रस्त्यावरून जाणार्‍या वन कर्मचार्‍यांच्या अंगावर पडले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ज्ञानदेव बाबूराव ससाणे (वय 55, रा. कळस, ता. इंदापूर) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 22) घडली. ससाणे हे वनविभागाच्या कामकाजासाठी शुक्रवारी इंदापूर शहरात येत होते. इंदापूर – अकलूज रोडवर खुळे चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कडेचे झाड तोडण्यात येत होते. ते झाड ससाणे यांच्या अंगावर पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांना इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेचे झाड तोडताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नव्हती. रस्ता वाहतुकीसाठी बंद केला नव्हता. मशीनच्या साह्याने वटलेले झाड तोडण्याचे काम खासगी कर्मचारी करीत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ससाणे यांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

याबाबत उपअभियंता दीपक भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन झाड तोडत होतो. स्थानिक कर्मचार्‍यांचे अहवालानुसार आम्ही काळजी घेतली होती. इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी म्हणाले की, संबंधितांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT