पुणे

आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेस वृक्षतोडीप्रकरणी दंड

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी देवाची येथील सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या सचिव व अध्यक्षांवर संस्थेच्या आवारातील वृक्षांची विनापरवानगी वृक्षतोड केल्या प्रकरणी आळंदी नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून बारा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी ही माहिती दिली. वारकरी शिक्षण संस्थेची अमृत ओढ्या लगत अडीच एकर जमीन आहे. श्री श्री रविशंकरजींच्या शिष्य परिवाराकडून साधारण साठ झाडे या जमिनीत लावण्यात आली होती.

त्याच बरोबर जुनी लिंबाची सहा झाडे होती. ती अध्यक्ष संदिपान जनार्दन पाटील व सचिव बाजीराव शंकर चंदिले यांनी बेकायदा तोडून विकली. ही बेकायदेशीर वृक्षतोड लक्षात आल्यानंतर सुखदेव पवार पाटील व दिनकर भुकेले या विश्वस्तांनी आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. सदर अर्जाची दखल घेऊन, प्रत्यक्ष पाहणी करून, पंचनामा करून साठ हजार रुपये दंड रक्कम आकरण्यात आला. सुनावणी अंती बारा हजार रुपये दंड आकारण्यात आला. संस्थेकडून धनादेशाद्वारे सदर दंडात्मक रक्कम पालिकेकडे भरण्यात आली. वरील आर्थिक दंडा बरोबरच साठ झाडे लावून वाढविण्याची शिक्षाही सुनावण्यात आल्याचे समजते.

SCROLL FOR NEXT