पुणे : 'बालभारती ते पौडफाटा या प्रस्तावित रस्त्याचा विकास आराखडा करताना रस्ता जोडला जाणार्या दोन्ही ठिकाणी चौक निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या,' अशी मागणी माजी नगरसेवक नीलेश निकम यांनी केली आहे. बालभारती ते पौडफाटा या प्रस्तावित मार्गासंदर्भात निकम यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले. हा मार्ग ज्या ठिकाणी जोडला जाणार आहे. तेथे चौक निर्माण झाल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याचा विचार आराखडा तयार करताना करावा. उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार केल्यास कोणत्याही रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही.
तसेच विधी महाविद्यालय टेकडीवर फिरावयास जाणार्या नागरिकांना कांचनगल्ली येथे अंडरपास तयार करावा, टेकडीवरून वाहत येणार्या पावसाच्या पाण्याचा निचर्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, झाडांचे पुनर्रोपण करावे, अशा मागण्या निकम यांनी केल्या आहेत. यापुर्वी 2000-2001 साली या रस्त्याचे काम सुरू झाले होते. सुमारे दोन कोटी रुपये यासाठी खर्च झाला असून, टेकडीच्या काही भागात सपाटीकरण आणि रिटेनिंग वॉल बांधण्यात आली आहे, अशीही माहिती निकम यांनी दिली.