पुणे : पुढारी वृत्तसेवा: माजी नगरसेवकांनी पदपथांवर 'आय लव्ह…' असे डिजिटल नामफलक उभे करून पदपथ अडविले आहेत.
विशेष म्हणजे, नागरी सुविधांची उणीव भासणार्या उपनगरांमध्ये 'आय लव्ह…' नामफलकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरी प्रश्न सोडविण्यापेक्षा माननीयांनी परिसराच्या नावावरच जास्त प्रेम दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. मागील काही वर्षांमध्ये नागरिकांना भेडसावणारे मूलभूत व नागरी प्रश्न सोडविण्यापेक्षा मलई मिळणारी वरवरची कामे आणि संकल्पनेच्या नावाखाली चमकोगिरी करण्यावरच नगरसेवकांकडून भर दिला जात आहे.
प्रभागामध्ये दीर्घकाल टिकणारी कामे व प्रकल्प करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. सहा महिन्यांत किंवा वर्षभरात पुन्हा काम करण्याची संधी मिळावी, अशी कामे करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यात मार्चएंडपूर्वी निधी संपविण्यासाठी नवनवीन कल्पना लढवून गरज नसलेली कामे केली जातात. अशातच मागील दोन वर्षांत 'आय लव्ह…' असे इलेक्ट्रॉनिक नामफलक उभे करण्याचे पेव फुटले आहे. या ठिकाणी चौक नाही अशा ठिकाणीही पदपथ अडवून 'आय लव्ह…'चे नामफलक व स्ट्रक्चर उभे करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, मध्य शहराच्या तुलनेत उपनगरातील नागरिकांना मूलभूत सेवासुविधा कमी मिळतात. या मूलभूत सेवा सुविधांकडे लक्ष देण्यापेक्षा उपनगरांमधील माननीयांनी 'आय लव्ह…', वरवरची कामे करण्यावरच भर दिल्याचे चित्र दिसते. याकडे प्रशासन राजकीय दबावापोटी सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
तुम्हाला काय वाटते? 'पुढारी'ला कळवा
माजी नगरसेवकांनी मूलभूत सुविधा देण्यापेक्षा चमकोगिरीला प्राधान्य दिल्याचे आणि पदपथावर अतिक्रमण केल्याचे प्रकार सर्वत्र पाहायला मिळतात. याबद्दल तुम्हाला काय वाटते? हे आपण 9665077174 या व्हॉट्सअॅप नंबरवर दैनिक 'पुढारी'ला कळवावे