पुणे

आगडगावात 32 लाखांची वीजचोरी, स्टोन क्रशरमालकाविरोधात गुन्हा

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील आगडगाव येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या वीजजोडणीची महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केली. वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून गेल्या 2 वर्षांत एकूण 2 लाख 21 हजार 328 युनिटसची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कौडगाव येथील शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील आगडगाव येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या ठिकाणी थ्री फेज वीजजोडणी दिली आहे. सदर खडी क्रशरचे मालक दिलीप रंगनाथ गायकवाड हे आहेत. या ठिकाणी तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर व कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांच्यासह महावितरणचे भरारी पथक गेले असता, रोहित्रावरील वीज मीटरच्या मूळ जोडणीत फेरबदल करून या खडी क्रशरच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले.

यात गेल्या 2 वर्षांत एकूण 2 लाख 21 हजार 328 युनिटसची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रुपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने खडी क्रशरच्या मालकाला नोटीस देऊन वीज चोरीची रक्कम 32 लाख 54 हजार 940 रुपये व तडजोडीची रक्कम 13 लाख 10 हजार अशी एकूण 45 लाख 64 हजार 940 रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र, दिलेल्या मुदतीत खडी क्रशरच्या मालकाने सदर रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांनी मंगळवारी (दि.30) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खडी क्रशरचे मालक दिलीप रंगनाथ गायकवाड यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT