पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आकुर्डी येथील रोटरी क्लब ऑफ निगडी आणि त्याचे सीएसआर भागीदार एटीएस कन्व्हेयर्स यांच्या सहकार्याने आकुर्डी येथील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सेवा सुरू करण्यात आला आहे.
या विभागाचे उद्घाटन एटीएसचे व्यवस्थापकीय संचालक इव रायफेल यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ निगडीला एटीएस कंपनीने सीएसआर फंडातून वॉर्मर्स, फोटोथेरपी मशीन, कार्डियाक मॉनिटर्स, सिरिंज पंप आणि युनिट उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपयुक्त वस्तूंची व्यवस्था करून दिली.
यामुळे शहरातील गोरगरिबांना फायदा होणार आहे. आकुर्डी रुग्णालयात दर महिन्याला सुमारे 100 ते 140 महिलांची प्रसूती होत आहे. त्याचा गरीब व गरजू रुग्णांना फायदा होत आहे. नवजात मुलांची त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या काही महत्त्वाच्या तासांमध्ये अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते.
ही बाब लक्षात घेऊन आकुर्डी रुग्णालयात लहान मुलांच्या 'एनआयसीयू'साठी आवश्यक सुविधा देण्यात आली आहे. निगडी क्लबचे माजी अध्यक्ष जगमोहन भुर्जी, राकेश सिंघानिया, अध्यक्ष प्रणिता आलुरकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आकुर्डी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर उपस्थित होते.