मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, पोंदेवाडी, देवगाव, लाखणगाव, पारगाव परिसरात रविवारी (दि .7) दुपारी साडेतीनदरम्यान विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, खरिपातील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. मका, कडवळ यासारखी चारापिके भुईसपाट झाली आहेत.
ऊसही काही ठिकाणी पडला आहे. तीन ते चार दिवसाच्या विश्रांतीनंतर या भागात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अतिशय कमी वेळात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र शेतांमध्ये पाण्याची तळी साचल्याचे पाहावयास मिळत आहे. या पावसाचा फटका अनेक शेतकर्यांना बसला असून अनेक शेतीपिके साचलेल्या पाण्याखाली गेली आहेत. पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होणार असून त्याचा फटकाही शेतकर्यांनाच बसणार आहे. यावर्षी चांगला पाऊस होत असल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यास
फायदा होणार असला तरीही शेतातील उभ्या पिकासाठी मात्र हा पाऊस धोकादायक ठरू लागला आहे.