चाकण : पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण कमालीचे वाढत चालल्याच्या नोंदी पोलिस दप्तरी होत आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालय आल्यानंतर या कारवाया कमी होतील, अशी अपेक्षा असताना चाकण औद्योगिक भागात अद्यापही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे गुन्हा घडण्याची कारणे, पालकांशीही संवाद आणि गुन्ह्यांना चाप लावण्याच्या सूचना पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. बालगुन्हेगारी आणि शाळांच्या परिसरात वावरणार्या काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांवर कारवाया करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनीदेखील पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
त्यामुळे चाकण भागात शाळांच्या आवारात घिरट्या घालणार्या अल्पवयीन दुचाकी चालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. लहान वयात गुन्हेगारी कृत्याकडे आकर्षिले जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक मुले शाळेत जाऊन भांडणे करणे किंवा शाळाबाह्य तरुणांच्या संगतीत येऊन शाळा सोडून व्यसनाधीन होणे, प्रशालांच्या बाहेर मुलींची छेडछाड तसेच गुंडगिरी अशा गोष्टींना मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसून येत आहेत.
गुन्हेगारीच्या आकर्षणातून अनेक 15 ते 20 वयोगटातील युवक मग शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या विळख्यात आणि व्यसनांच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. अनेक शालेय विद्यार्थी रक्तरंजित हाणामार्या करताना पुढचा विचार मात्र अजिबात करत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातून प्राणघातक हल्ले व खुनासारख्या घटना घडत आहेत. चाकण परिसरात अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाया करण्याची मागणी स्थानिक मुबीन काझी व नागरिकांनी पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे.
चाकण आणि परिसरातील प्रशालांच्या आवारात अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाया सुरू करण्यात येणार आहेत. पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये.
– सुनील गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा चाकण