वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: दौंडज खिंड ते निरा (ता. पुरंदर) या अरुंद संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावर खड्डे पडले आहेत. पावसाची रिमझिम सुरू असल्याने व मागील तीन वर्षांपासून साइडपट्टी भरली नसल्याने साइडपट्टीची माती पाण्याने वाहून गेल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. जेजुरी औद्योगिक वसाहत संपल्यानंतर दौंडज खिंड ते निरा नदीवरील पुलापर्यंत हा रस्ता अतिशय अरुंद असून अनेक ठिकाणी रस्त्याला उतार असल्याने वाहने वेगात असल्यावर वाहनांवरचा ताबा सुटून अपघातही होत असतात. पिसुर्टी गावाजवळ रेल्वेने महामार्गाला लागून संरक्षक भिंत बांधल्याने रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.
संरक्षक भिंतीच्या दुसर्या बाजूस फक्त मुरूम भरून रस्ता रुंद करण्याचा प्रयत्न केल्याने पावसामुळे या परिसरात चिखल होत आहे. दौंडज गावाजवळ अनेक खड्डे पडले असून, हे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान होत असून दुचाकीवरील प्रवाशांना थेट अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अपघातात जखमी झालेले कित्तेक दुचाकीस्वार कायमचे जायबंदीही झाले आहेत. काही गंभीर जखमी कालांतराने पैशांअभावी उपचार न मिळाल्याने मृत्यूलाही सामोरे जात आहेत.
केवळ निविदा निघण्याकडेच लक्ष
दौंडज खिंड ते निरा या पालखी महामार्गावर वारंवार मोठे खड्डे पडतात. मात्र, दरवेळी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच संबंधित अधिकारी जागे होतात. संबंधित अधिकारी व ठेकेदार हे खड्डे बुजविण्याचे सोडून वृत्तपत्रात बातमी कधी येते आणि कामाची निविदा कधी निघते, याकडेच लक्ष देऊन बसतात का? असा सवाल प्रवासी आणि नागरिकांना पडला आहे.
लोकप्रतिनिधींचे झोपेचे सोंग
आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गाकडे झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाकडून या मार्गावर दुरुस्ती केली जात नाही. सर्वच लोकप्रतिनिधींकडून या रस्तादुरुस्तीकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही. जेजुरी, दौंडज, वाल्हे, निरा, लोणंद आदी मोठ्या गावांतील व परिसरातील अनेकांचे या धोकादायक अरुंद रत्यावर पडलेल्या खड्ड्यांने तसेच अरुंद रस्त्याने बळी गेलेत. तरीही कोणीही या तकलादू दुरुस्तीकडे लक्ष देत नाही.
मागील 10 ते 15 वर्षांपासून पालखी मार्गाचे रुंदीकरण लवकर होणार, असे ऐकत आलोय. मात्र, मागील 15 दिवसांपासून या पालखी महामार्गाजवळची झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. पालखी महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल, अगोदर या मार्गावरील खड्डे बुजवा.
– नीलेश भुजबळ, माजी उपसरपंच, दौंडज