पुणे

अमरावतीचा श्रेणिक साकला देशात पहिला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणार्‍या जेईई मेन्स परीक्षेच्या दुसर्‍या सत्राचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशातील 24 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए स्कोअर मिळविला आहे. यामध्ये अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील श्रेणिक साकला याने 100 स्कोअर मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा घेण्यात आली असून, निकाल 'एनटीए'च्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

देशातील 440 शहरांमधील 622 परीक्षा केंद्रांवर 25 ते 30 जुलैदरम्यान 13 भाषांमध्ये, तर देशाबाहेरील 17 शहरांमध्ये परीक्षा घेण्यात आली. गेली दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवल्याने जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण यंदा घटल्याचे संस्थाचालकांकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील सर्व संस्थांमध्ये जेईई परीक्षेचे धडे गिरवणारे जितके विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरतात, त्या तुलनेत यंदा पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचेही संस्थाचालकांनी सांगितले आहे.

खुल्या गटाचा कटऑफ मात्र याला अपवाद असून, या गटाचा कटऑफ 0.5 पर्सेंटाइलने वाढला आहे. परीक्षेत पुण्यातील विद्यार्थ्यांची समाधानकारक कामगिरी झाली असून, अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान मिळविला आहे. देशातील पहिल्या तीन हजार विद्यार्थ्यांमध्येही पुण्यातील सातशे ते आठशे विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.

SCROLL FOR NEXT