पुणे

अबब…! एका खांबासाठी कोटीचे हायमास्ट दिवे

अमृता चौगुले

मिलिंद कांबळे :

पिंपरी : स्पर्धेच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगरच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियमसाठी खर्चाचा सपाटा सुरूच आहे. आता, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नावाखाली हायमास्टच्या चार खांबांचे दिवे बदलण्यासाठी साडेपाच कोटींचा खर्च करण्यात येत आहे. एका खांबावरील दिव्यांच्या खर्च तब्बल सव्वाकोटी इतका आहे. तसेच, स्थापत्य व इतर बाबींसाठी कोट्यवधींची उधळपट्टी अपेक्षित आहे. केवळ एकाच खेळाच्या स्पर्धा आयोजनावर सुरू असलेल्या वारेमाप खर्चाबाबत क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील दिवस-रात्र सामने होण्यासाठी 12 वर्षांपूर्वी स्टेडियमवर सुमारे दोन कोटी खर्च करून हायमास्टचे चार खांब बसविण्यात आले. त्यानंतर त्या दिव्यांचा फारसा वापर झाला नाही. खेळाऐवजी जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी त्या प्रकाश योजनेचा लाभ झाला. वापर न झालेले हे शोभेचे दिवे आता आऊटडेटेड झाले असून, त्याचे आयुष्य संपल्याचा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी
केला आहे.

महापालिकेने या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात सहा देशांच्या कनिष्ठ गट हॉकी स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या सामन्याचे जागतिक पातळीवर थेट प्रेक्षपण केले जाणार आहे. त्यामुळे जागतिक हॉकी महासंघाने स्टेडियमवर अद्ययावत दर्जाचे एलईडी दिव्यांची प्रकाश व्यवस्था करण्यास पालिकेस सांगितले आहे. त्यानुसार तेथील चारही हायमास्टच्या खांबांचे दिवे बदलण्यात येत आहेत. एलईडी दिव्यांमुळे 2,000 'एक्स लेव्हल'चा प्रकाश मैदानात पडणार आहे. त्यामुळे चित्रीकरण अधिक सुस्पष्ट होऊन लढतीचे प्रक्षेपण करणे सुलभ होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

एका खांबावर 150 एलईडी दिवे तसेच, फिटींग बसविले जाणार आहेत. हे काम पुढील आठवड्यात सुरू करून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाणार आहे. एका खांबासाठी सव्वाकोटी असे तब्बल साडेपाच कोटींचा खर्च आहे. स्टेडिमयच्या सुशोभीकरण व रचनेत बदल करण्यासाठी स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी 5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्पर्धा आयोजन व इतर बाबींसाठीही मोठा खर्च आहे. स्पर्धेसाठी किमान 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

पालिकेतर्फे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेवर सुमारे 12 कोटींचा खर्च केला गेला. त्यावेळी दिवस-रात्र सामने खेळविले गेले. स्पर्धेचे देशभरात प्रेक्षपणही केले केले. ती स्पर्धा होऊन 7 महिने होत नाहीत, तो पुन्हा नव्याने खर्च काढण्यात आला आहे. एकाच खेळाच्या स्पर्धा आयोजनावर अशा प्रकारे वारेमाप खर्च केला जात असल्याने क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. इतर खेळांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जाव्यात अशी मागणी होत आहे.

शहरातील एकही खेळाडू सहभागी नसला, तरी वारेमाप खर्च
डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील एकही खेळाडू महाराष्ट्र संघात नव्हता. नियोजित सहा देशांच्या कनिष्ठ गट हॉकी स्पर्धेतही शहरातील एकही खेळाडू नसणार आहे. हॉकी इंडियाच्या नावलौकीकासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधीचा खर्च करून स्पर्धा आयोजनाचा हेतू निव्वळ आर्थिक उधळपट्टी असल्याचे स्पष्ट होत आहे.

पॉलिग्राससाठी पावणेेचार कोटींचा खर्च
स्टेडियमवर सन 1989 मध्ये पहिल्यांचा हिरव्या रंगाची पॉलिग्रास बसविण्यात आले. त्या कामाची सुरूवात काँग्रेसचे नेते प्रा. रामकृष्ण मोरे व उद्योजक राहुलकुमार बजाज यांच्या हस्ते झाली. या ठिकाणी सन 1994 मधील नॅशनल ग्रेम्सच्या हॉकी स्पर्धेचे काही सामने खेळविण्यात आले. पॉलिग्रास खराब झाल्याने तो 2003 मध्ये बदलण्यात आला. त्या कामाची सुरूवात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाली. भाजपच्या सत्ताकाळात नव्याने 3 कोटी 77 लाख खर्च करून डिसेंबर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी नियमानुसार निळ्या रंगाची पॉलिग्रास बसविण्यात आली. कोरोना महामारीमुळे मैदानाचे उद्घाटन न होता, सराव सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT