पुणे

पिंपरी : महापालिका शाळांत शून्य कचरा प्रकल्प

अमृता चौगुले

वर्षा कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मुलांना विद्यार्थिदशेतच कचरा न करण्याचे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचे संस्कार देण्यात येत आहेत. यासाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या आठ शाळांमध्ये शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आसरा फाउंडेशन या संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर या शाळा देण्यात आल्या असून, त्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू आहे.

ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे शिक्षण

कचरा वस्तू आहे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली तर कचरा पेट्यांची आवश्यकता पडत नाही, यासाठी मुलांना ओला व सुका कचर्‍याचे नियोजन कसे करावे हे शिकविले जात आहे. शून्य कचरा मोहिमेतून मुलांपर्यंत हे संस्कार पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. लहानपणासूनच मुलांना हे संस्कार रुजवले तर त्याचा नक्कीच फायदा होईल या विचारातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

आपण कित्येक गोष्टीचे संस्कार मुलांना लहान वयात देतो. सध्या मुलांमध्ये संस्कार शिबिरे आणि संस्कार वर्गातून मुलांना अनेक विषयांवर संस्कार देण्याचे काम केले जाते. याबरोबरच मुलांना शून्य कचर्‍याचे संस्कार देण्याचा विचार पुढे आला आहे.

शून्य कचरा प्रकल्प म्हणजे काय

कचर्‍याचे ओला, सुका आणि घातक असे वर्गीकरण करण्यात येते. हिरवा चारा व कंपोस्ट निर्मिती केली जाते. कुजणारा कचरा कंपोस्ट खतनिर्मिती टाकीमध्ये जमा होतो. यामध्ये वर्गीकरणानंतर सुका कचरा (न कुजणारा-प्लास्टिक, भंगार, कागद, काच) जमा करून नवनिर्मिती केली जाते. शून्य कचर्‍यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य, जाणीव जागृतीसाठी तासिका घेऊन संस्कारवर्ग चालू आहे.

प्लास्टिकमुक्त कचर्‍यासाठी महिनाभर प्लास्टिक गोळा करायचे नंतर ते पुनर्वापर करणार्‍या संस्थेला विकले जाते. यामध्ये सुका कचरा, ओला कचरा व घातक कचरा वेगळा केला जातो. शाळांमध्ये जो ओला कचरा असतो तो डब्यातील उरलेले अन्न पदार्थ एका झाडाखाली एक ताट ठेवून त्यामध्ये उरलेले अन्न पक्ष्यांसाठी टाकले जाते.

सध्या पायलट प्रोजेक्टमधील आठ शाळांची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. या शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. वर्गीकरण झालेल्या कचर्‍याचे पुढे काय, यावर हा तोडगा काढला आहे. तसेच, येणार्‍या पिढीवर आत्तापासून शून्य कचर्‍याचे संस्कार रुजविल्याने याचा भविष्यात फायदा होणार आहे.
                                                  – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT