Ajit Pawar statement controversy
बारामती: करमाळ्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीच्या स्वरूपाचेच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत पक्ष कार्यालयात जनता दरबार घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अंजना कृष्णा या सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू या गावात अवैध उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना फोनद्वारे आक्षेपार्ह भाषा वापरली होती. याप्रकरणी राज्यभरातून टीका झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी आपली भूमिका मांडली होती. परंतु युगेंद्र पवार यांनी त्यांचे वक्तव्य चुकीचेच असल्याचे सांगितले. (Latest Pune News)
युगेंद्र पवार म्हणाले, कोणालाही अशा प्रकारचे संभाषण आवडणार नाही. मलाही ते आवडले नाही. शेवटी त्या एक आयपीएस अधिकारी आहेत. त्यातही त्या महिला आहेत. तुम्ही काय बोलताय, कशासाठी बोलताय हे तुम्ही पाहिले पाहिजे. जे झाले ते चुकीचे झाले, असेही युगेंद्र पवार यांनी नमूद केले.
त्यांनीही चूक मान्य केली होती
त्या मुलाखतीत मला विचारण्यात आले की, कुटुंबात ही निवडणूक झाली किंवा कुटुंब वेगळे झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर मी बोललो की, कुटुंबात भांडण झालेले कोणालाही आवडत नाही, त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. अजित पवार यांनी देखील लोकसभेला उमेदवार देणे चूक होते असे म्हटले. आमच्याकडून पण विधानसभेला ही चूक झाली. कुठल्याही कुटुंबात दोन गट तयार होत असतील तर ते कोणालाच आवडत नाहीत.
राजकारणामुळे कुटुंब दूर गेले
युगेंद्र पुढे म्हणाले, कुठेतरी असले राजकारण थांबले पाहिजे. मग आमचे कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातील इतर काही कुटुंबे असतील, जी राजकारणामुळे एकमेकांपासून दूर गेली आहेत. वैचारिकदृष्ट्या एकमेकांपासून लांब गेली आहेत.
त्या वाक्याचा विपर्यास
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत युगेंद्र पवार यांनी यापुढे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते. त्यासंबंधीचा खुलासा त्यांनी केला. ते म्हणाले, पूर्ण मुलाखत व्यवस्थित कोणीही पाहिलेली नाही. अर्धवट वक्तव्यावर चर्चा झाली आहे. त्या मुलाखतीत मी त्या व्यतिरिक्त खूप काही बोललो होतो.
परंतु ते सोडून एकाच वाक्यावर चर्चा केली गेली. मी पुढे असेही म्हटले होते की, मी काम करत राहणार आहे. मी बारामती सोडून जाणार नाही. बारामती माझे घर आहे. त्यामुळे माझे काम पाहून लोकांनीच निर्णय घेतला, तर लोकच मला निवडणुकीला उभे करू शकतील आणि निवडून देतील; मात्र त्याऐवजी एकाच वाक्याचा विपर्यास करण्यात आला.