पुणे : आधी पाच ते सहा गीतांचा समावेश असलेला म्युझिक अल्बम तयार केला जायचा… पण, आता त्याची जागा सिंगल साँग अल्बमने (एकल गीताचा अल्बम) घेतली आहे. सध्या तरुण कलाकारांकडून अशा सिंगल साँग अल्बमची निर्मिती केली जात आहे. तरुण गायक – गायिका स्वत:च्या आवाजात एकच गीत ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत. अशा एकल गीतांना सोशल मीडियावर पसंतीची पावतीही मिळत आहे. यातून अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली आहे.
एकल गीत म्हणजे एकाच गायिकेने किंवा गायकाने गायिलेले गीत होय. याच तरुण गायक-गायिकांचे एकल गीतांचे ऑडिओ आणि व्हिडीओ सोशल मीडियावर 'ट्रेंड'मध्ये आहेत. नव्या माध्यमांचा वापर करून कलेचे सादरीकरण करणारे अनेक तरुण कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. तरुण गायक-गायिकांच्या प्रेमगीतांपासून ते लोकगीतांपर्यंतच्या अशा विविध विषयांवरील एकल गीतांना यू-ट्यूब चॅनेल, फेसबुक, इन्स्टाग्रामवर चांगले व्ह्यूजही मिळत आहेत. या उद्योन्मुख कलाकारांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी निर्मातेही पुढे सरसावले आहेत.
संगीतकार गायक श्रेयस नंदा देशपांडे म्हणाले, 'एकल गीतांचे लेखन, गायन, संगीताची जबाबदारी तरुण कलाकारच पेलत आहेत, या गीतांना रसिकांची भरभरून दादही मिळत आहे. स्वत:च्या गायकीची, संगीताची ओळख जगभर पोचविण्यासाठी या पद्धतीची गीते नवकलाकार सादर करीत आहेत. रील्सद्वारेही गीते सोशल मीडियावर गाजत आहेत.'
एकल गीताचा खास व्हिडीओही हल्ली तयार केला जात आहे. हा व्हिडीओ खास लोकेशन्सवर आणि गीताच्या थीमनुसार शूटही केला जात असून, व्हिडीओचे एडिटिंग झाल्यावर ही एकल गीते यू-ट्यूब चॅनेल, फेसबुकवर अपलोड केली जात आहेत, तर इन्स्टाग्रामवरही रील्स स्वरूपात ती पाहायला मिळतील.
आपले संगीत असो वा गायकी ती रसिकांपर्यंत पोचविण्यासाठी एकल गीते तयार करण्याकडे नवकलाकारांचा कल वाढला आहे. इतरांसोबत गाण्यापेक्षा स्वत:च्या आवाजात चार मिनिटांचे गीत ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात रेकॉर्ड करून सिंगल साँग अल्बमची निर्मिती केली जात आहे. हा ट्रेंड अलीकडेच वाढला असून, स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरुणाईचा युगल गीते गाण्यापेक्षा एकल गीतांकडे कल वाढला आहे. मी संगीत दिलेल्या एकल गीतांना रसिकांनीही दादही दिली आहे.
– विनित देशपांडे, युवा संगीतकार