दाणेवाडीतून युवक बेपत्ता; त्याच गावात विहिरीत आढळला शीर नसलेला मृतदेह Pudhari
पुणे

दाणेवाडीतून युवक बेपत्ता; त्याच गावात विहिरीत आढळला शीर नसलेला मृतदेह

परिसरात उडाली खळबळ; डीएनए अहवालानंतरच तपासाला येणार गती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिरूर शहराजवळील दाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील 19 वर्षांचा युवक माऊली गव्हाणे हा गुरुवारी (दि. 6) रात्री घरातून बेपत्ता झाला होता. आता त्याच गावातील विहिरीत शीर नसलेला मृतदेह बुधवारी (दि. 12) एका पोत्यात आढळून आला. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. मात्र, हा मृतदेह बेपत्ता माऊलीचा आहे की अन्य कोणाचा याचा शोध पोलिस घेत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माऊली हा गुरुवारी (दि. 6) घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याचा पेपर असल्याने तो शिरूरला आला होता. या वेळी तो दोघांशी बोलताना दिसला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या मोबाईल बंद झाला. त्यामुळे माऊलीच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार शिरूर पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, बुधवारी (दि. 12) सकाळी दाणेवाडीतील एका विहिरीत शीर नसलेल्या मृतदेह पोत्यात आढळून आला. त्यामुळे गावात खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत शेकडो युवक शिरूर पोलिस ठाण्यात जमा झाले.

विहिरीत आढळलेला मृतदेह माऊलीचा आहे की अन्य कोणाचा याबाबतीत डीएनए चाचणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलिस देखील माऊलीचा शोध घेत आहेत. डीनएनएचा अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक गती येईल, असे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. दाणेवाडीचे माजी उपसरपंच कांतीलाल गव्हाणे यांनी या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने शोध लावून यामागील सत्य पुढे आणावे, अशी मागणी केली आहे.

कुटुंबीयांसह नातेवाइकांची पोलिस ठाण्यात धाव

बेपत्ता असलेला माऊलीचा आठवडाभरापासून शोध न लागल्याने कुटुंबीयांसह नातेवाइकांनी शिरूर पोलिस ठाण्यात येत तपासाबाबत माहिती मागितली. तर मृतदेह सापडल्याने लवकरात लवकर माऊलीचा शोध घ्यावा, अशी मागणी केली. दरम्यान, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच माऊलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT