टाकळी भीमा: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेतमधील बोरा फार्मजवळ भीमा नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेला युवक पाण्यात बुडाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आपदामित्र व अग्निशमन दलाला यश आले.
तळेगाव ढमढेरे येथील भीमा शेतजवळील बोरा फार्म येथील गणपती विसर्जनसाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले (वय 31, सध्या रा. भीमाशेत तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. शिरशी, ता. कंधार, जि. नांदेड) हा शनिवारी (दि. 6) नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. (Latest Pune News)
आपदामित्र व अग्निशमन दलाने दोन दिवस त्याचा शोध घेतला. अखेर सोमवारी (दि. 8) सकाळच्या सुमारास काही नागरिकांना विठ्ठलवाडी बंधाऱ्यातून भीमराव याचा मृतदेह वाहत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी याबाबत शिक्रापूर पोलिसांना कळविले.
पोलिस हवालदार किशोर तेलंग, संदीप इधाते, आपदामित्र गणेश टिळेकर, शेरखान शेख, पुणे महानगर विकास प्राधिकरण अग्निशमन दलाचे उमेश फाळके, शुभम चौधरी, शुभम बढे, दिग्विजय नलावडे, सागर जानकर, साईनाथ मोरे, रोहित भिसे, अभिषेक पवार यांनी विठ्ठलवाडी येथे धाव घेत मंडलाधिकारी गणपत मरबळ, विठ्ठलवाडीचे तलाठी आबासाहेब रुके, पोलिस पाटील शरद लोखंडे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे, तळेगाव ढमढेरेचे तलाठी दशरथ रोडे यांच्या उपस्थितीत विठ्ठलवाडी पाणीपुरवठा विहिरीशेजारून भीमरावचा मृतदेह तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढला. याबाबत प्रभाकर एकनाथ चेरले यांनी फिर्याद दिली आहे.