तरुणीवर सामूहिक बलात्कार संग्रहित छायाचित्र
पुणे

बोपदेव घाट अत्याचार : मित्राचे हात पाय शर्टाने बांधले तर धाक दाखवून तरुणीवर केला बलात्कार

पुढारी वृत्तसेवा

कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी शस्त्राच्या धाकाने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मित्राचे हात शर्टाने तर पाय बेल्टने बांधून तिघा नराधमांनी हे कृत्य केले. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे बंद असलेल्या पोलिस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. दरम्यान, तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक माहिती कोंढवा पोलिसांना दिली. याप्रकरणी, कोंढवा पोलिसांनी तिघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, मनोज पाटील, उपायुक्त आर. राजा, निखील पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप तिघा आरोपींचा शोध लागला नसून, त्यांचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.03) रात्री बारा ते दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुळची गुजरात येथील आहे. ती शहरातील एका कॉलेजमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते. तर तिचा मित्र जळगावचा असून, तो सीएच्या अभ्यासक्रमाला आहे. मित्रांच्या मार्फत दोघांचा परिचय झाला. गुरुवारी सायंकाळी हा तरुण त्याच्या सहकारी तरुणीसह एका क्लायंटकडे गेला होता. तेथून परत येत असताना त्याला पीडित तरुणीचा फोन आला. त्यानंतर ते दोघे भेटले. तेथून तिच्याच दुचाकीवर दोघे बोपदेव घाटात आले. या तरुणीला घाटामधून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पाहायचे होते. त्यासाठी दोघेही घाटामध्ये आले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. काही वेळानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना शस्त्राच्या धाकाने धमकावले. तरुणीच्या मित्राने आरडाओरडा करू नये याकरिता त्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीच्या मित्राचा शर्ट आरोपींनी काढला. त्याने त्याचे हात बांधले तर पॅन्टच्या बेल्टने त्याचे पाय बांधले. त्यानंतर त्याला एका झाडाला बांधले.

हा प्रकार पाहून तरुणी घाबरली. आरोपींनी तिला देखील शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींनी तरुणीचे चांदीचे दागिने चोरी केले असून, तिच्या मित्राचा मोबाईल देखील जाताना घेतला होता. मात्र पाहून तो परत दिला. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने कसेबसे स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. मित्राने, तरुणीला धीर दिला. दोघांनी हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. त्यांनी मदत करत तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोंढवा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणीच्या मित्राकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. सध्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांची चौदा पथके त्यांच्या मागावर आहेत. श्वान पथकांना देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

अत्याचाराच्या वाढत्या घटना

शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वानवडी परिसरात एका शाळेतील दोन मुलींवर विद्यार्थी वाहतूक करणार्‍या चालकाने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (3 ऑक्टोबर) उघडकीस आली. पोलिसांनी गाडीचालकाला अटक केली. संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केली होती. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले होते. विविध संस्था, संघटना, तसेच राजकीय पक्षांनी याप्रकरणी आंदोलन केले होते.

बोपदेव घाटात परिसरात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या घटनेची माहिती शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बलात्कार करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.
रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे

धोकादायक बोपदेव घाट

बोपदेव घाटात फिरायला येणार्‍या तरुण-तरुणींना धमकावून लुटमारीच्या घटना आधीही घडल्या आहेत. या भागात तरुणींना धमकावून अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. बोपदेव घाटातील लुटमारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT