पुणे: पबमध्ये ड्रान्स करणार्या तरुणींना धक्का देणार्या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणींना धक्का दिल्यानंतर त्यांना जाब विचारणार्या बाऊन्सर महिलेला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना येरवडा भागातील एका मॉलमध्ये असलेल्या पबमध्ये घडली. याप्रकरणी गणेश दादाभाऊ घावटे (वय 34, रा. मु. पो. अण्णापूर, ता. शिरूर) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला बाऊन्सरने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील एका मॉलमध्ये असलेल्या पबमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पबमध्ये शनिवारी रात्री तरुणी नृत्य करत होत्या.
आरोपी पबमधील डान्स फ्लोअरवर नृत्य करत होते. त्या वेळी दोघांनी तरुणीला धक्का दिला. हा प्रकार पाहून पबमधील महिला बाऊन्सरने दोघांना बाजूला नृत्य करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी महिला बाऊन्सरला शिवीगाळ करून विनयभंग केला. दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.