पुणे: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून गेल्या दोन आठवड्यांत चार रुग्ण पळून गेल्याच्या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षा त्रुटींवर कारवाई करत सहा कर्मचार्यांना निलंबित केले. यामध्ये चार सेवक आणि दोन हवालदारांचा समावेश असून, संरक्षण भिंतीचा अभाव व कर्मचार्यांचा निष्काळजीपणा या दोन्ही कारणांवरून ही घटना घडल्याचे चौकशीत समोर आले आहे.
येरवडा मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जाण्याची पहिली घटना 29 जुलै रोजी घडली. नांदेडचा 37 वर्षीय रुग्ण पुरुष कक्षातून फरार झाला. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील 35, 40 आणि 45 वयोगटातील अलीकडेच व्यसनमुक्ती उपचारासाठी दाखल झालेले तीन रुग्ण पळून गेले. (Latest Pune News)
घटना समोर येताच 8 ऑगस्ट रोजी रुग्णालय प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सहा कर्मचार्यांना निलंबित केले. दोन वरिष्ठ डॉक्टर आणि दोन कक्ष सहाय्यकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून सात दिवसांचा कालावधी दिला. नांदेडचा रुग्ण अद्याप सापडलेला नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी दिली.
“संरक्षण भिंतीचा अभाव आणि कर्मचार्यांचा निष्काळजीपणा यामुळे ही घटना घडली. प्राप्त प्रस्तावावरून सहा जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे,” असे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले.