पुणे

Pune News : वेल्हे-हवेलीसह पश्चिम पट्ट्यातील पिवळं सोनं उद्ध्वस्त

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड, राजगड, तोरणा, पानशेत, मोसे, मुठा खोर्‍यातील कष्टकरी मावळी शेतकर्‍यांचं पिवळं सोनं उद्ध्वस्त झालं आहे. जिल्ह्यात भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेल्हे, हवेली तालुक्यांसह पश्चिम पट्ट्यातील उभी भात पिके शुक्रवारी (दि. 10) दुपारपासून पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसाने भुईसपाट झाली आहेत. ऐन दिवाळीच्या सणाला हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रावरील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ देऊनही यंदा 50 ते 60 टक्के उत्पन्न मिळण्याची शक्यता होती. मात्र, तेही अवकाळी पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकर्‍यांची दिवाळी कडू झाली आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. सिंहगड किल्ल्याच्या चोहोबाजूंना धो-धो पाऊस कोसळू लागला. त्यानंतर पाऊस सर्वदूर पसरला. दिवाळीच्या सुट्यांमुळे मोठ्या शेतकर्‍यांनी पिकांची कापणी सुरू केली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे कापणी केलेले पीक भातखाचरांत भिजून पाण्यावर तरंगू लागले. काही ठिकाणी पीक भुईसपाट झाले.

खानापूर, डोणजेपासून पानशेतपर्यंत पुणे-पानशेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वत्र पावसाने अक्षरश: थैमान घातले. मांगदरी, आंबवणे भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. हवेली तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सिंहगड, खामगाव, मावळ, आंबी, सोनापूर, वरदाडे, मालखेड, थोपटेवाडी, कल्याण, आर्वी भागातही मोठा पाऊस झाल्याने पीक झोडपले गेले. वेल्हे तालुक्यातील 3 हजार हेक्टर, हवेलीतील 2 हजार हेक्टर, तर शेजारच्या मुळशी व भोर तालुक्यातील 5 हजार हेक्टर, असे 10 हजार हेक्टर क्षेत्रातील उभ्या भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

धो-धो पावसाचे पाणी भातखाचरांत साचून उभी पिके भुईसपाट झाली आहेत. कापणी केलेले पीक भिजून वाया गेले आहे. त्यामुळे चांगल्या तांदळाचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार आहे. याची दखल घेऊन शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी.

– तानाजी मांगडे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अवकाळी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी विभागाला दिल्या आहेत.

– दिनेश पारगे, तहसीलदार, वेल्हे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT