पुणे: दौंड तालुक्यातील यवत गावात एका तरुणाने ठेवलेल्या आक्षेपार्ह व्हॉट्सॲप स्टेटसमुळे आज (दि.१) सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्टेटसमुळे दोन समाजात गैरसमज पसरला आणि दोन्ही गट आमनेसामने आले. आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. या संपूर्ण प्रकरणावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वाची माहिती दिली असून, संबंधित तरुणाला अटक करण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तणावाची माहिती घेतली असून, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, " सध्या यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारे स्टेटस ठेऊन कोणीही दोन समाजात तणाव निर्माण करू नये. पोलीस यावर योग्य कारवाई करतील".
आज सकाळी यवतमधील एका तरुणाने एका पुजाऱ्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असलेले स्टेटस आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले होते. ही पोस्ट मध्य प्रदेशातील एका घटनेशी संबंधित असली तरी, स्थानिक पातळीवर त्यातून मोठा गैरसमज निर्माण झाला आणि अफवा पसरली. यानंतर दोन्ही समाजातील नागरिक एकत्र जमले, ज्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
या घटनेनंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने माहिती घेऊन परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज त्या तरुणाने जी पोस्ट व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवली आहे, ती मध्य प्रदेशातील एका घटनेशी निगडित आहे. त्यामुळे काही लोकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरल्याने ही घटना घडली," असे भोयर यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस महानिरीक्षक (आयजी) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी गावातील सर्व प्रमुख नागरिकांना एकत्र बसवून बैठक घेतली आणि त्यांची समजूत काढली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, गावात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही भोयर यांनी म्हटले आहे.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. "कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत," असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.