यवत:
अन्नदानाचा लावा मेळा ।
भुकेल्यांचा भरा घास पेला ॥॥
अन्न पूर्णब्रह्म जाणावे ।
प्रेमे सर्वांना वाढवावे ॥१॥
दारी आला जो भुकेला ।
विठ्ठल भेटे त्या रूपाला ॥२॥
सेवाभाव अंतरी ठेवा ।
दीनजनांचा धावा घ्या ॥३॥
दानामध्ये नाही अभिमान ।
तेथे वसे श्रीनारायण ॥४॥
तृप्त झाले जेवणारे ।
आशीर्वाद देती सारे ॥५॥
तुका म्हणे सेवा खरी ।
विठ्ठल भेटे अंतरी ॥॥
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवत (ता. दौंड) येथे मुक्कामी होता. लोणी काळभोर ते यवत हा पायी प्रवास करून आलेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी यवतला तब्बल दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी आयोजित करण्यात आली. ग्रामस्थांनी यंदाही अन्नदानाची ८२ वर्षांची परंपरा भक्तिभावाने आणि उत्साहात जपली.
गावातील घराघरांत भाकऱ्या तयार करण्याचे काम सुरू असतानाच यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात सकाळपासूनच पिठलं तयार करण्याची लगबग सुरू झाली. मंदिर परिसरात मोठ्या कढईंमध्ये पारंपरिक पद्धतीने पिठलं तयार करण्यात आले. एका कढईत सुमारे ६० किलो पिठलं बनविण्यात येत होते. त्यासाठी २० किलो बेसण तसेच सुमारे ४० किलो कांदा, मिरची, लसूण, तेल, मसाले व इतर साहित्य वापरण्यात आले. अशा एकूण १४ ते १५ कढईंमध्ये पिठलं तयार करून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या अन्नदानासाठी गावातील युवकांनी दिवसभर परिश्रम घेतले. पिठलं तयार करणे, भाकऱ्या जमा करणे, भोजन वाढणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि शिस्तबद्ध नियोजन, अशा विविध जबाबदाऱ्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्या. ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी सेवाभावाची ही परंपरा पुढे चालवत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
या भोजनाचा लाभ केवळ वारकरी भाविकांसह पालखी सोहळ्यासाठी दिवसरात्र कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय यंत्रणांतील अधिकारी व कर्मचारीही आस्वाद घेतात. अनेक अधिकारी दरवर्षी यवतच्या पिठलं-भाकरीची आतुरतेने वाट पाहत असतात. मागील वर्षी एक टन पिठलं आणि एक लाख भाकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यंदा पिठलं-भाकरीच्या भोजनासाठी वाढलेली मागणी लक्षात घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.