पुणे

कुंभारगाव येथील श्री लक्ष्मीदेवीची दोन दिवस यात्रा

अमृता चौगुले

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : भिगवण परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कुंभारगाव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा दि. 11 व 12 एप्रिल रोजी होत आहे. या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती सरपंच उज्ज्वला परदेशी यांनी दिली. दि. 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्यात देवीला अंघोळ घालण्याची व त्याचबरोबर संपूर्ण गावाने अंघोळ करण्याची येथील जुनी परंपरा आहे. त्यानंतर पहाटे देवीचा दंडवत, सकाळी 10 वाजता देवीचा नैवेद्य, सायंकाळी देवीचे चोळी-पातळ, तर रात्री साडेनऊ वाजता भव्य छबिना काढण्यात येणार आहे.

यामध्ये दारूगोळ्याचे आकर्षण डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते. परंपरेनुसार पालखी मिरवणुकीचा मान भोई समाजाला दिला जातो.
दि. 12 रोजी पहाटे चार वाजता मनोरंजनपर मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून, सकाळी साडेनऊ वाजता हजेरी व सायंकाळी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला आहे. आखाड्यात मोठ्या प्रमाणात मल्लांची मांदियाळी पाहावयास मिळणार आहे.

यात्रेचे औचित्य साधून येथील लक्ष्मी मंदिराची साफसफाई करून रंगरंगोटी करीत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, असे परदेशी यांनी सांगितले. कुंभारगाव येथे लक्ष्मीदेवीचे अतिशय जुने मंदिर असून तालुक्यात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख आहे. त्यामुळे दर्शनासाठी व नवस बोलण्यासाठी भक्तांची गर्दी पाहावयास मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT