Sugar Factory Pudhari
पुणे

Yashwant Sugar Factory: यशवंत साखर कारखान्याकडून थकीत उसबिले देण्यास सुरुवात; १४ कोटींची रक्कम अदा होणार

तीन गळीत हंगामांतील प्रलंबित देणी देण्याचा निर्णय; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पाच शेतकऱ्यांना धनादेशांचे वितरण

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरविणाऱ्या शेतकरी सभासदांना कारखाना बंद पडताना थकीत असलेल्या तीन हंगामातील उसबिले देण्यास सुरुवात झाली असून, यापाेटी १४ कोटी ७ लाख १४ हजार ६५९ रुपये रक्कम अदा करण्यात येणार आहेत.

यासंदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही संचालक मंडळाने सुरू केली आहे. या प्रयत्नाचा भाग आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपाध्यक्ष रत्नाबाई काळभोर, संचालक प्रताप गायकवाड, माजी संचालक बाळासाहेब चौधरी, संचालक संतोष कांचन, किशोर उंद्रे, राहुल घुले, सुनील कांचन यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते.

कारखाना सुरू करण्यासाठी दिवंगत अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. प्रलंबित असलेली जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. भविष्यात कारखाना सुरू होईल, यात शंका नाही. तब्बल १५ वर्षांनंतर कारखाना सुरू होण्यासाठी तालुक्याने यातना सहन केल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे अदा करताना 'एका डोळ्यात दु:ख, तर एका डोळ्यात आनंद' असल्याची भावना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केली.

यशवंत सहकारी साखर कारखाना पुढील गळीत हंगामात सुरू करण्याचा प्रयत्न असून, संचालक मंडळ उपलब्ध झालेल्या भांडवलातून केवळ संस्थेचे हित डोळ्यांसमोर ठेवून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भागभांडवल थकीत देणी भागवून संस्थेच्या पायाभरणीसाठी आवश्यक आर्थिक खर्चाच्या बाबी पूर्ण करून कारखाना सुस्थितीत चालू होईल, यासाठी दक्षता घेणार आहे.
सुभाष जगताप,अध्यक्ष, श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT