पुणे

पुणे : पीएमपीला दिली रेल्वे प्रवाशांची लेखी माहिती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून प्रवासी नसल्यामुळे हडपसर टर्मिनलवरील फीडर बससेवा बंद केली. ती सुरू करण्याऐवजी 'रेल्वेचे येथे प्रवासी असतील तर लेखी द्या,' असेही पीएमपीकडून सांगण्यात आले होते. त्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांची लेखी माहिती पत्राद्वारे पीएमपीला पाठवली आणि बससेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. परंतु, आता यावर पीएमपी प्रशासन 'प्रवासी हिता'साठी काय कार्यवाही करणार, हे पाहावे लागणार आहे.

रेल्वेची हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस दररोज सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी हडपसर टर्मिनल येथे येत असते. तर पुणे-हैदराबाद एक्स्प्रेस दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी हैदराबादकडे रवाना होते. त्याद्वारे दररोज 900 प्रवाशांची येथे ये-जा असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. यासह अनेक डेमू गाड्यांचे हडपसर टर्मिनल येथून नियोजन असते. मात्र, तरीदेखील पीएमपीने येथील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांना दीड ते दोन किलोमीटरपर्यंत अवजड बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. ही पायपीट प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

हडपसर रेल्वे टर्मिनल येथील बससेवेला प्रवाशांचा खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येथील बससेवा बंद केली आहे. याबाबत रेल्वे अधिकार्‍यांशीसुद्धा नुकतीच चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे आम्ही आमचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक यांना येथील पाहणी करून प्रवाशांचा, तेथील मार्गांचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल आल्यावर हडपसर टर्मिनल येथून सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष, पीएमपीएमएल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT