पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून होणार्या दिरंगाईचा साहित्यिकांनी-कलाकारांनी निषेध केला आहे. त्यासाठी आता साहित्यिक-कलाकार एकवटले आहेत. 30 एप्रिलपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा घोषित झाला नाही, तर महाराष्ट्रातील साहित्यिक-कलाकार महाराष्ट्र स्थापनादिनी 1 मे रोजी काळी फीत लावून दिरंगाईचा निषेध करणार आहेत. दुसरीकडे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी खासदारांना पत्र पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
30 एप्रिलपर्यंत मराठीला हा दर्जा मिळावा, अशी मागणी साहित्यिक-कलाकारांनी केली आहे.
नुकतेच अभिजात मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी आणि डॉ. महेश केळूसकर यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करावा, या मागणीचे पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना पाठविले आहे. मोहिमेला रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, लक्ष्मीकांत देशमुख, रामदास भटकळ, कौतिकराव ठाले-पाटील आदी साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे.
खासदारांना सर्व स्तरातून पत्र पाठविण्याची मोहीम राबविणार
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी संसदेत एकजुटीने आवाज उठविण्यासाठी आता खासदारांना पत्र पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मराठीभाषिक प्रेमींना मराठीच्या अभिजात दर्जासाठी खासदारांना पत्र पाठविण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकजुटीने संसदेच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवावा आणि मराठी भाषेच्या सन्मानार्थ संबंधित मंत्र्यांना अंतिम निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे फुटाणे यांनी सांगितले. पोस्टाने, टि्वटर, ई-मेल अशा विविध
माध्यमांद्वारे हे पत्र खासदारांना पाठविण्यात यावे, असेही फुटाणे यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. ही काही राजकीय मागणी नसल्याने मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी. महाराष्ट्र स्थापना दिनापूर्वी हा दर्जा मराठीला दिलाच पाहिजे.
– लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक