पुणे

पुणे: मोशीत गाजला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा, नामवंत मल्लांनी मारले मैदान

अमृता चौगुले

मोशी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गर्दीने खचाखच भरलेले मैदान अन श्वास रोखून बसलेले शेकडो कुस्तीशौकीन, प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवत आपल्या तालीमीच नाव गाजवणारे राज्यातील नामवंत मल्ल यांनी मोशीचा कुस्ती आखाडा गाजवला निमित्त होते कुस्तीगिरांचे व मल्लविद्येचे आश्रयस्थान म्हणून लौकिक असलेल्या मोशी (ता. हवेली) येथे नागेश्वर महाराजांच्या उत्सवाचे.

यंदाच्या आखाड्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. यामुळे नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनानी दुपार पासूनच हजेरी लावली होती यामुळे आमराई मैदान गर्दिने गजबलेले होते. गेल्या दोन दशकांपासून मोशी व कुस्ती हे एक अजोड समीकरणच बनले आहे. अनेक महाराष्ट्रकेसरी घडविण्यात मोशीकरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यंदाची यात्रेतील आखाड्याची स्थिती पाहता या गावची लाल मातीशी जुळलेली नाळ अधिकच घट्ट झाल्याचे दिसून आले. दुपारी सुरू झालेला आखाडा संध्याकाळी उशिरा पर्यंत सुरू होता.

सर्वच नामांकित मल्लांच्या कुस्त्या या आखाड्याकडे दिसून आल्या. मोशी गावचा ऐतिहासिक वारसा कुस्तीच्या बाबतीत समृद्ध असून गावात चार ते पाच तालमी आहेत. तेव्हाच्या काळात प्रत्येक घरटी एक पैलवान तालमीत असे आपल्या डावपेच सादर करत पंचक्रोशीत गावचे नाव समृद्ध करत असे.मोशीत भरवण्यात आलेल्या या आखड्यामुळे गावचे गावपण आजही कायम असल्याचे दिसून आले.
नियोजनबद्ध पद्धतीने आखाडा भरवण्यात आला असल्यामुळे पैलवान व कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले. यंदाच्या आखड्याची खासीयत म्हणजे संपूर्ण निकाली कुस्त्या यू ट्यूब, फेसबुकसारख्या सोशल साईटवर लाईव्ह दाखविण्यात येत होत्या. यात्रेतील इतर कार्यक्रमात व्यस्त असणार्‍या रसिकांना यामुळे आपल्या मोबाईलवर असेल त्या ठिकाणी निकाली कुस्त्यांचा आनंद घेता येत होता.

या वेळी आखाड्यात नामवंत मल्लांसह, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, नागरिक, ग्रामस्थ, कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेनिमित्ताने शिवरात्रीनंतर भंडारा उत्सव, भव्य लिलाव, छबिना मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, निकाली कुस्त्या आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT