पुणे: पोलिस भरतीची तयारी करणार्या तरुणांना धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याप्रकरणी पैलवानांसह सात जणांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तळजाई येथील मैदानावर पैलवानांनी राडा केला.
याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, नीलेश केदारी, हर्षवर्धन सावंत, तौशिफ, पात्रुट व इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
याबाबत विकास मेटकरी (वय 32) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात विकास मेटकरी आणि रवींद्र चव्हाण हे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.15) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास विकास मेटकरी हे पुणे फिटनेस अॅकॅडमी मुले- मुली असे आम्ही तळजाई ग्राउंड, लुंकड शाळेजवळ, पद्मावती, पुणे येथे धावण्याचा सराव करत होते.
या वेळी धक्का लागल्याच्या कारणावरून ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, नीलेश केदारी, हर्षवर्धन सावंत, तौशिफ, पात्रुट व इतरांनी मेटकरी व त्यांचा मित्र रवींद्र चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये मेटकरी यांच्या डाव्या डोळ्याला व चेहऱ्याला दुखापत झाली.
तेव्हा त्याच्यापैकी एका आरोपीने बाजूला पडलेला दगड दोन्ही हातामध्ये उचलला. त्यानंतर याला आज जिवे ठारच मारतो, असे म्हणून मेटकरी यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी तो दगड चुकवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या वेळी पुणे फिटनेस अॅकॅडमीमधील मुली मारहाण होत असलेल्यांना सोडवण्यास गेल्या असता त्यांना आरोपींपैकी एकाने अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी मुलींना हातवारे व सर्वांना उद्या पहाटे ग्राऊंडला कसे येता ते बघतो, असे म्हणून धमकी दिली.
या वेळी झालेल्या राड्यात रवींद्र चव्हाण यांची सोन्याची साखळी गहाळ झाली आहे. भांडण झाल्यानंतर पुणे फिटनेस अॅकॅडमी या इन्स्टाग्रामवर चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणार्या एका विरुद्धही याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पवार गुन्ह्याचा तपास करत आहेत.
तळजाई मैदानावर झालेल्या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, आरोपी हे कुठल्याही तालमीशी संबंधित असल्याचा आणि आरोपींनी वरिष्ठ पोलिस अधिकार्याच्या नावाचा वापर करून धमकाविल्याबाबत फिर्यादीत कुठेही उल्लेख नाही.
मुलींकडे बघून अश्लील शेरेबाजी
आरोपी स्थानिक तालमीत सराव करणारे पहिलवान असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या घटनेनंतर काही विद्यार्थी सहकारनगर पोलिस ठाण्यात गेले. तर काही विद्यार्थी हे पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या देऊन बसले होते. मारहाण करणाऱ्या गुंडांनी मुलींकडे बघून अश्लील शेरेबाजी केली.
आमच्यावर पूर्वाश्रमीचे पहिलवान असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचा हात आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकीही देण्यात आल्याचे या वेळी नाव न घेण्याच्या अटींवर विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. एका पैलवानाने एका विद्यार्थ्याला धक्का देवून भांडण काढले. विद्यार्थ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तुम्हाला बघतोच, असे म्हणून तो तिथेच थांबून राहिला. त्याने चारचाकी गाड्यांमधून आणखी काही जणांना बोलावून घेतले. त्या पैलवानांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली.