सुवर्णा चव्हाण
सध्या इन्स्टाग्राम-फेसबुकवर नाटकांची प्रसिद्धी करणार्या रील्सची धूम असून, 30 सेकंद ते 1 मिनिटांच्या या रील्सला इन्स्टाग्राम, फेसबुकवर चांगले व्ह्यूव्ज मिळत आहे. त्यामुळे नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आता नाट्य संस्था, निर्मात्यांकडून रील्सचे माध्यम मोठ्या प्रमाणात वापरले जात असून, यामुळे नाटकाची माहिती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचत आहे, याचा फायदाही नाट्य संस्था, निर्मात्यांना होत आहे. फक्त रील्स नव्हे, तर नाटकांचे टीझरसह पॉडकास्टमधूनही नाटकांविषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सोशल मीडियाने मराठी रंगभूमीला नवे वळण दिले आहे.
आतापर्यंत प्रसिद्धी फलकांसह इतर पारंपरिक माध्यमाद्वारे नाटकांची प्रसिद्धी केली जायची; पण आता नाट्य क्षेत्रातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सोशल मीडियाकडे वळले आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे रील्स...नाट्य संस्थांच्या, निर्मात्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम, फेसबुक पेजवर 10 ते 12 रील्स अपलोड केले जात असून, रील्स शूट करण्यापासून ते रील्स एडिट करण्यासाठीची खास टीम नाट्य संस्थांनी, निर्मात्यांनी तयार केली आहे.
नाटकांच्या प्रसिद्धीसाठी रील्स हे महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. गुरुवारी (दि.27) साजरा होणार्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त दै. पुढारीने नाटकांमधील या बदलत्या ट्रेंडबद्दल जाणून घेतले. नाट्य व्यवस्थापक समीर हंपी म्हणाले, ’सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेऊन आता नाट्य संस्था आणि नाट्य निर्मातेही सोशल मीडियावर नाटकांची प्रसिद्धी करत आहेत. खास करून नाटकांच्या प्रसिद्धीसाठी रील्सला विशेष महत्त्व दिले जात आहे.
नाट्य व्यवस्थापक सत्यजित धांडेकर म्हणाले, नाटकांमधील कलाकारांच्या संवादापासून ते महिन्याभरात असलेल्या प्रयोगांची माहितीही रील्सद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहे. तिकीट विक्रीची माहितीही त्याद्वारे दिली जात असून, त्याचा फायदाही नाट्य संस्था, नाट्य निर्मात्यांना होत आहे. नाटकांच्या प्रसिद्धीसाठी पॉडकास्ट आणि टीझरचाही वापर होत आहे.
युट्यूबवर कलाकारांच्या मुलाखती
नाट्य कलावंतांच्या मुलाखती, नाटकातील काही दृश्यांचे खास व्हिडीओ, नाट्याभिवाचन, असे सारे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले जात आहे. व्यावसायिक, प्रायोगिक आणि संगीत नाटकांची खास टीझर्समधून कुतूहलता निर्माण करण्यात येत असून, नाटकांचे कथानक, त्यात भूमिका करणारे कलाकार आणि नाटकांचे वैशिष्ट्य, असे सारे काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. नाटकांचे टीझर्स आणि व्हिडीओ यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड करून नाटकांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच, नाटकातील कलाकारांच्या मुलाखतीवर आधारित पॉडकास्टही यू-ट्यूबवर अपलोड केले जात आहेत.
काळानुरूप बदलत आम्हीही नाटकाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. आमच्या नाटकांचे रील्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केले जात असून, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रील्स तयार करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. या नव्या माध्यमामुळे प्रेक्षकांपर्यंत नाटकांची माहिती अगदी योग्यरीत्या पोचत आहे.- भाग्यश्री देसाई, नाट्य निर्माती.