पुणे

जागतिक मातृ दिन |’सिंगल मदर’ पेलतेय मुलांसह कुटुंबाचे अवकाश!

Laxman Dhenge

पुणे : काही वर्षांपूर्वी पतीसोबत वेगळे झाले. त्यानंतर एका मुलाच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर आली. सुरुवातीला नोकरी मिळत नव्हती. भाड्याचे घर मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागला. पण, मी आत्मविश्वासाने चालत राहिले आणि नोकरी करीत आज मुलाच्या शिक्षणाची आणि कुटुंबाची जबाबदारी पेलत आहे. सिंगल मदर (एकट्याने कुटुंब सांभाळणारी आई) म्हणून अनेकांनी त्रास दिला. पण, कधी हरले नाही, जिद्दीने संघर्षाला सामोरे गेले आणि आज अडचणींवर मात करीत आनंदाने मुलासह आयुष्य जगत आहे, असे पुण्यातील अमिता जाधव (नाव बदलले आहे) सांगत होत्या.

आत्ताच्या घडीला अमिता यांच्याप्रमाणे अनेक महिला सिंगल मदर म्हणून आयुष्य जगत आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातही सिंगल मदर्सची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सिंगल मदर्सचे प्रमाण अंदाजे 10 ते 15 टक्के असून, 25 ते 50 वयोगटातील महिलांनी सिंगल मदर म्हणून जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये सिंगल मदरची संख्या सर्वाधिक असून, आतातर ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण वाढत आहे. आयटी क्षेत्रासह वैद्यकीय, शिक्षण, कला आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांत काम करणार्‍या महिला सिंगल मदर असून, त्या आत्मविश्वासाने, निर्भीडपणे स्वत:ची आणि मुलांची जबाबदारी पेलत आहेत. काही महिला पतीच्या निधनामुळे सिंगल मदर म्हणून आयुष्य जगत आहेत. सिंगल मदरसमोर अनेक आव्हाने असून, त्याचा जिद्दीने सामना करीत त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. रविवारी (दि. 12) साजर्‍या होणार्‍या जागतिक मातृ दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने याबद्दल जाणून घेतले. फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन पुणेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे म्हणाल्या, 'शहरी भागासह आता ग्रामीण भागामध्येही सिंगल मदरचे प्रमाण वाढत आहे. त्या मोठ्या ताकदीने कुटुंबाची, मुलांची जबाबदारी पेलत आहेत.'

व्यवसायात भरारी

सिंगल मदर असलेल्या अनेक महिलांनी आज व्यवसायक्षेत्रात नाव कमावले आहे. कोणी कपडे विक्रीचा व्यवसाय करीत आहे, तर कोणी हॉटेल चालवत आहे. कोणी ऑनलाइन व्यवसाय करीत आहेत, तर कोणी छायाचित्रणाच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत. व्यावसायिक म्हणून त्यांनी नवी ओळख निर्माण केली असून, अनेकींनी व्यवसायाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.

काही वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झाल्यानंतर मी माझ्या मुलीची जबाबदारी खंबीरपणे पेलली आहे. पतीपासून कशाला वेगळी झालीस, असे अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम होते. सुरुवातीला व्यवसाय करताना कोणीही मदत केली नाही. भाड्याने घरही कोणी देत नव्हते. मुलीची जबाबदारी कशी पेलशील, वडिलांची गरज पडतेच, अशा गोष्टीही ऐकाव्या लागल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत जगण्याची नवी वाट शोधली. कष्ट करीत व्यवसाय उभा केला, मुलीची जबाबदारी पेलली आणि आपले आयुष्य घडविले. सिंगल मदर म्हणून एखादी महिला खूप चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने, एकटीने मुलांची जबाबदारी पेलू शकते, ही बाब आता समाजाने स्वीकारली पाहिजे.

– संध्या पाटील, महिला व्यावसायिक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT