पुणे

पुणे : शृंगेरीपीठालगतच्या सेवा रस्त्याचे काम सुरू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौक प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या शृंगेरीपीठ येथील कोथरूडकडून वारजेकडे जाणार्‍या सेवारस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तेथे सुमारे 80 मीटर मार्गावर सध्या एक लेन उपलब्ध होईल. मात्र, हा रस्ता झाल्याने कोथरूडकडून वारजेला जाताना वाहनचालकांना मुंबई-बंगळुरू महामार्गावर किंवा त्याखालील भुयारी मार्गाने जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
या प्रकल्पात महामार्गालगत दोन लेनचा सेवा रस्ता बांधण्यासाठी शृंगेरीपीठ येथील 548 चौरस मीटर जागा लागणार आहे.

त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या जागेपैकी मोकळी असलेली 338 चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात या महिन्यात आली. त्या जागेवर सेवा रस्ता बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हाती घेतले.

चांदणी चौकाकडे कोथरूडकडून जाताना महामार्गाखाली असलेल्या भुयारी मार्गालगत अलीकडील बाजूला हा दोन लेनचा रस्ता बांधण्यात येत आहे. तेथे दोन्ही बाजूंनी रस्त्याचे काम झाले असून, शृंगेरीपीठालगतच्या जागेचा ताबा नसल्याने तेथील रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्याचे काम महिनाभरात पूर्ण होईल. मात्र, दोन्ही बाजूला दुपदरी रस्ता उपलब्ध झाला, तरी या 80 मीटर मार्गावर सध्या एकच लेन उपलब्ध हाणार आहे.

SCROLL FOR NEXT