पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 येथील दुसर्या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पेठ क्रमांक 12 मध्ये 40 एकर क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात 4 हजार 883 घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी येथे घरे उभारली आहे. या प्रकल्पात एकूण 45 इमारतींचा समावेश आहे. वन बीएचके प्रकारातील 3 हजार 317 तर, टू बीएचके प्रकारातील 1 हजार 566 सदनिका उभारल्या आहेत. तसेच, या गृहप्रकल्पात सोलर वॉटर हीटर, सोलर पॅनल, अंतर्गत रस्ते, क्रीडांगण, बगीचा, पार्किंग अशा विविध सुविधा आहेत. 3 हजार 200 कुटुंबीयांना घरांचा ताबा दिलेला आहे.
दुसर्या टप्प्याचे काम सुरु
पेठ क्रमांक 12 या गृहप्रकल्पातील दुसर्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये 6 हजार 452 सदनिका असणार आहेत. या गृहप्रकल्पाचे एकूण क्षेत्र 29 एकर इतके आहे. प्रकल्पात एकूण 47 इमारती उभारल्या जाणार आहेत. पार्किंग आणि 14 मजले अशी प्रत्येक इमारतीची रचना असेल. या प्रकल्पाचे 1102 कोटी 92 लाख रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक आणि 730 कोटी रुपयांची निविदा रक्कम यासाठी मान्यता मिळालेली आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी तसेच बांधकाम परवानगी मिळालेली आहे. तसेच, कामाचे आदेश देण्यात आले आहे. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
काय असणार सुविधा ?
प्रकल्पामध्ये 3 बगीचे, 24 आणि 18 मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते, दररोज 40 लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा, सौरऊर्जेचा वापर, अडीच हजारांपेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.
टप्पा-2 मध्ये उभारली जाणारी घरे
घरांचा प्रकार उत्पन्न गट घरांची संख्या कार्पेट क्षेत्र (चौ. मी.)
वन बीएचके ईडब्ल्यूएस 3320 29.5
वन आरके ईडब्ल्यूएस 332 25.70
2 बीएचके एलआयजी 1456 59.26
2 बीएचके एलआयजी 1344 48.89