मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने हडपसर येथील जुन्या कालव्यामधून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने प्रधिकरणाला नोटीस देण्यात आली आहे. मात्र, या नोटिशीकडे दुर्लक्ष करत प्रधिकरणाने हे काम सुरूच ठेवले आहे. यामुळे पाटबंधारे विभाग आता काय निर्णय घेणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. नियमानुसार कालव्यामधून, तसेच त्याच्या भरावावरून कोणते काम करण्यास पाटबंधारे विभागाकडून परवानगी दिली जात नाही. केवळ कालव्याच्या भरावाच्या
बाजूने काम करण्यास परवानगी दिली जाते. ती पण भरावाला कोणतीही हानी पोहचणार नाही या अटीवर.
मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाटबंधारे विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवून हडपसर येथील जुन्या कालव्यामधून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. याविषयी नागरिकांना पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्यावर 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पाटबंधारे विभागाने पत्र देऊन कालव्यामध्ये टाकलेले पाईप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांनी याची दखल न घेता काम सुरूच ठेवले आहे.
परवानगी न घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कालव्यामधून चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत आम्ही प्राधिकरणाच्या अधिकार्यांना पत्र दिले आहे. आता आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत.
– योगेश भंडलकर, उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
पुढे पाणी नेण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध नाही. म्हणून कालव्यातून पाईपलाईन टाकत आहे.
– विश्वनाथ पवार, उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन