पुणे

पुणे : कृषी आयुक्तालयातील फर्निचरचे काम अखेर थांबले

अमृता चौगुले

पुणे : येथील कृषी आयुक्तालयातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहातील फर्निचरसह इतर कामे सोमवारी थांबविण्यात आली आहेत. शिवाय त्याचे दरवाजेही बंद केल्याचे दिसून आले. सुस्थितीत असलेली आयुक्तांची केबिन व गरज नसताना तोडफोड करुन सुरु असलेल्या सुशोभीकरणावर 'पुढारी'ने आवाज उठविला होता. त्याची दखल मंत्रालयातून घेतल्यामुळेच हे काम तूर्त थांबविल्याचे समजते.

शिवाजीनगर येथे कृषी आयुक्तालयाचे संकुल उभारणीचा सुमारे 250 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु होत आहे. उत्तम फर्निचर तोडून नव्याने नूतनीकरण व सुशोभीकरणावर 1 कोटी 20 लाखाची उधळपट्टी सुरु आहे. खर्च करण्यात येत असलेल्या रकमेतून किमान 15 ते 20 कार्यालये सुसज्य करता आली असती, अशीही चर्चा विभागात आहे. दुष्काळी स्थिती असताना शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी कृषी आयुक्तालयात झगमगाटावर होणा-या उधळपट्टीवर 'पुढारी'ने आवाज उठवला होता.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची केबिन आणि लहान सभागृहाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. सभागृहाचे काम तुर्तास थांबविण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसले. या बाबत मंत्रालय स्तरावरुन सूत्रे हलली असून, उधळपट्टीची गंभीर दखल कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि सचिव अनुप कुमार यांनी घेतल्याचे समजते.

निविदांची माहिती नाही

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अतुल पाटील यांच्याकडून कृषी आयुक्तालयाच्या फर्निचर व अनुषंगिक कामाची अधिक माहिती घेण्यासाठी भेट घेतली असता ते कार्यालयात उपलब्ध होऊ शकले नाहीत. संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या कामांच्या निविदा काढल्या होत्या किंवा नाही याबद्दलची माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT