पुणे

पुणे : आशा वर्करवर कामाचा भार; शहरातील तब्बल पंचाहत्तर टक्के पदे रिक्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शासन आणि प्रशासनाने आरोग्यविषयक घेतलेल्या निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजाणी होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा वर्करची शहरातील तब्बल पंचाहत्तर टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे 25 टक्के आशा वर्करच कामाचा भार वाहत असल्याने रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात आहे. राज्य शासनाने आणि महापालिकेने घेतलेल्या आरोग्यविषयक विविध निर्णयांची, उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम आशा वर्करच्या माध्यमातून केले जाते.

कोविड काळातही वस्त्यांमध्ये जाऊन सर्वे करण्यासह लसीकरणामध्येही आशा वर्करचे काम उल्लेखनीय राहिले आहे. याशिवाय, स्तनदा मातांची तपासणी करणे, लहान मुलांच्या लसीकरणाच्या नोंदी ठेवणे, पूर्व-प्रसूती झालेल्या व कमी वजनाच्या बालकांची माहिती ठेवणे, रुग्णालयातच प्रसूती होण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करणे, गर्भवती महिलांचा आत्मविश्वास वाढवणे, नवजात बालकांना होणार्‍या आजारांची माहिती घेणे व त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, घरोघरी जाऊन विविध प्रकारचे सर्वे करणे, कुष्ठरोग, क्षयरोगाचे रुग्ण शोधणे, गोळ्या औषधांचे वाटप करणे आदी कामे आशा वर्करच्या माध्यमातून केली जातात.

या कामासाठी आशा वर्कर जेवढे जास्त काम करतील, तेवढे जास्त मानधन मिळते. हे मानधन मासिक 3 हजारांपासून 15 हजारांपर्यंत असते. पुणे शहरात 40 टक्के भाग झोपडपट्टयांचा असल्याने एक हजार नागरिकांमागे एक याप्रमाणे आशा वर्करची पदे मंजुर आहेत. पुणे शहरात 1 हजार 124 आशा वर्करची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात 298 आशा वर्करच काम करतात. जवळपास 74 टक्के पदे रिक्त आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात 1 हजार नागरिकांमागे एक याप्रमाणे आशा वर्करची पदे मंजुर झालेली आहेत. परंतु, अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आम्ही वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

                                            नीलेश दातखिळे, उपाध्यक्ष,
                               राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ.

SCROLL FOR NEXT