पुणे

समृद्धीसाठी सहकाराने घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत काम करा: मोहोळ यांची अपेक्षा

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकारातून समृद्धीसाठी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेऊन वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेतील प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांनी काम करावे, अशी अपेक्षा केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे व्यक्त केली. तसेच, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये वैकुंठ मेहता संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असून, सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रविवारी (दि.16) त्यांनी येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला भेट दिली. त्यांनी वैकुंठ मेहता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. संस्थेच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन मोहोळ यांचे स्वागत केले. मोहोळ यांनी संस्थेचे प्राध्यापक आणि कर्मचारी सदस्यांशी संवाद साधत 1967 पासून सहकार क्षेत्रातील वैकुंठ मेहता संस्थेची भूमिका समजावून घेतली. संस्थेमध्ये चालवल्या जाणार्‍या सर्व केंद्रांचा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी सहकारी संस्थांबाबत आपले विचार मांडले.

संस्थेच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी संस्थेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवरील संक्षिप्त सादरीकरण केले. तसेच, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर संस्थेने राबविलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देत सहकारात महिला विकास आणि उद्योजकतेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. संस्थेने सहकार क्षेत्रासाठी प्रशिक्षण, संशोधन, सल्लागार आणि सायबर सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकल्याचे नमूद केले.

अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना शंभर टक्के रोजगार

सेंटर फॉर मॅनेजमेंट एज्युकेशनअंतर्गत गेली तीन दशके, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट, अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या 31 तुकड्यांमधून तरुणांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सहकार, बँकिंग आणि कृषी-व्यवसाय उद्योगात शंभर टक्के रोजगार (प्लेसमेंट) मिळवून देण्यात आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT