पुणे : वित्तिय साक्षरतेतून विद्यार्थी व महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. डिजीटल बँकिंग, विविध अॅप्स, डिजीटल बँकिंग बाबत काळजी, आणि पत वाढविण्यासंदर्भात अद्ययावत रहावे असे आवाहन आरबीआयच्या मुख्य सरव्यवस्थापक कल्पना मोरे यांनी केले. बँकिंग लोकपाल या योजनेची माहिती व त्यांची कार्यवाही या संबंधीची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भारतीय रिझर्व बँक, वित्तिय समावेशान आणि विकास विभाग मुंबई यांच्या वतीने एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसर व बँक ऑफ महाराष्ट्र, क्षेत्रीय कार्यालय, औद्योगिक वसाहत हडपसर पुणे येथे 'वित्तिय साक्षरता सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महाव्यवस्थापक राजेश सिंह यांनी, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वित्तीय व्यवहार महत्वाचे असल्याचे सांगितले. बँकेची कार्यपद्धती, बँकेमार्फत विद्यार्थी, महिला बचत गट व सर्व सामान्य नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या अर्थ सहाय्याबाबतीतील विविध सोयी सुविधा यांची माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी जिल्ह्यातील सर्व बँकाच्या माध्यमातून विविध सामाजोपयोगी शासकीय तसेच महामंडळा मार्फत अनुदान विषयक विविध योजना राबवत असल्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. सरडे यांनी केले.
यावेळी महाबँकेचे पुणे पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक धवन, संदीप कुलकर्णी, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते. संतोष गदादे, संजय मांढरे, डॉ. भागवत, डॉ.मुंढे, डॉ. देशमुख यांनी सहकार्य केले.