पुणे; पुढारी वृत्तसेवा : अन्नपूर्णा परिवारातर्फे 30 व्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रतिज्ञा व चित्रफीत माध्यमातून अन्नपूर्णा परिवाराच्या कष्टकरी महिलांनी 'एकीचे बळ' जपण्याचा आणि सामाजिक सलोखा जपण्याचा निर्धार केला. या सभेत सुमारे 300 महिलांनी सहभाग नोंदवला. 'अन्नपूर्णा परिवार' हा पुणे व मुंबई येथे कार्यरत असलेल्या महिला सक्षमीकरणासाठी 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 6 संस्थांचा समूह आहे. गरजू महिलांचे व त्यांच्या कुटुंंबांचे सक्षमीकरण करणे व त्यांना आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक व बालविकासासाठी साहाय्य करणे हे अन्नपूर्णा परिवाराचे उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही सभा आयोजित केली होती.
या कार्यक्रमात अन्नपूर्णाच्या संस्थापक, अध्यक्षा डॉ. मेधा पुरव-सामंत, संकेत मुनोत, सुरेश धोपेश्वरकर आदी उपस्थित होते. अन्नपूर्णा परिवाराच्या सभासदांपैकी काही महिलांना सर्वोत्तम उद्योजक पुरस्कार, सकारात्मक सामाजिक बदल यासाठी पुरस्कार आणि सर्वोत्तम गट पुरस्कार विश्वस्त वृषाली मगदूम, चित्रा खिंवसरा आणि अंजली पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
डॉ. पुरव – सामंत म्हणाले, यावर्षी अन्नपूर्णातर्फे त्यांच्या सभासदांना पेन्शन देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात कुटुंबावरच सर्वस्वी अवलंबून राहावे लागणार नाही. मुनोत यांनी 'सामाजिक सलोखा, संविधान हक्क' याबद्दल महिलांना मार्गदर्शन दिले. धोपेश्वरकर यांनी भाषणात आजच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात सत्कार झालेल्या भाजी- फळविक्रेत्या प्रियंका शेळके म्हणाल्या, 'मला माझ्या कुटुंबाने आणि अन्नपूर्णा परिवाराने माझा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मदत केली. मला माझा व्यवसाय आणखी वाढवायचा आहे.' संस्थेचा आर्थिक अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला वाघोले यांनी सादर केला. सिद्धी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अन्नपूर्णाच्या 'एकजूट – एक मूठ ' या विचारांवर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. सभासदांनी एकतेची शपथ घेतली.