शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : जागतिक महिला दिन साजरा होत असताना शिक्रापूर पोलिस ठाणे येथे संपूर्ण कारभार महिला पोलिस कर्मचार्यांनी सांभाळला. यानिमित्त आम्ही देखील पुरुषांप्रमाणे सक्षम असल्याचे महिला पोलिस कर्मचार्यांनी दाखवून दिले. सर्वप्रथम महिला पोलिस कर्मचार्यांचा पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलिस नाईक अपेक्षा तावरे यांनी कारभार पहिला. त्यांना मदतनीस म्हणून राणी भागवत यांनी काम केले, तर बिनतारी संदेशसाठी गीता बराटे यांनी काम पहिले. अन्य महिला पोलिस कर्मचार्यांनी विविध कामे पाहिली.
दिवसभरात आलेल्या सर्व तक्रारी, संदेशसह पोलिस ठाण्यातील कोणते कर्मचारी कोणत्या कामासाठी कोठे रवाना झाले, यासह सर्व बाबींच्या नोंदी देखील चोखपणे नोंदवून ठेवल्या. आलेल्या सर्व नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्याचे काम या वेळी या कारभार सांभाळणार्या कर्मचार्यांनी केल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान, महिला दिनानिमित्त करंदीच्या पोलिस पाटील वंदना साबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, काकासाहेब शेलार यांनी सर्व महिला पोलिस कर्मचार्यांचा सन्मान केला.