पुणे

पुणे : नऊवारी, मराठमोळी नथ अन् बुलेटवर स्वार ; बाइक रॅलीत महिला-युवतींची धूम

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पारंपरिक वेशभूषेत महिलांचा जोश… 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करणार्‍या युवती… मोठ्या आत्मविश्वासाने बुलेटवर स्वार झालेल्या महिला-युवतींचा दांडगा उत्साह अन् लहान मुलींनीही आईसोबत घेतलेला सहभाग… असे उत्साही वातावरण रविवारी दै. 'पुढारी' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'तर्फे आयोजित महिलांच्या भव्य बाइक रॅलीत पाहायला मिळाले. यामध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अन् 'पुढारी' कार्यालयापासून सुरू झालेल्या या बाइक रॅलीने पुणेकरांचे लक्ष वेधले. कोणी पारंपरिक पेहराव केला होता, तर कोणी जिन्स अन् पांढरा कुर्ता, असा पेहराव केला होता… मोठ्या कुशलतेने अन् आत्मविश्वासाने दुचाकी चालवत महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला. 'नारीशक्तीचा विजय असो'चा जयघोष सगळीकडे घुमला.

'डाबर ग्लुकोप्लस सी' प्रस्तुत महिलांच्या भव्य बाईक रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता मित्रमंडळ चौकाजवळील 'पुढारी' कार्यालयातून झाली. 'कलर्स मराठी'वरील कलाकार इंद्रनील कामत, रसिका वाखारकर, प्रतीक्षा मुणगेकर आणि अमृता धोंगडे यांच्या उपस्थितीने रॅलीत महिला-युवतींचा उत्साह आणखी वाढला. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील, 'भरोसा सेल'च्या पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पवार यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकाच्या वादनाचा निनाद अन् युवतींच्या साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी मने जिंकली.

मराठमोळी नथ, नऊवारी साडी, डोक्यावर फेटा अन् हातात नारीशक्तीचा संदेश देणारे फलक अन् दुचाकीवर स्वार झालेल्या महिला-युवतींनी पुणेकरांचे लक्ष वेधले. त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी सर्वांचे मोबाईल कॅमेरे सरसावले आणि त्यांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. बाजीराव रस्त्यावर रॅलीचे आगमन झाल्यावर महिलांनी 'सावित्रीबाई फुले यांचा विजय असो' असा जयघोष केला अन् 'कलर्स मराठी'वरील कलाकारांनी हा जयघोष करीत महिलांसोबत दुचाकीवर स्वार होण्याचा आनंद घेतला.

महिला-युवतींना प्रशस्तिपत्र
कोणी बुलेटवर, तर कोणी स्कूटीवर… अशा विविध प्रकारच्या दुचाकींवर स्वार झाले. पण, 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या सदस्यांसह इतर महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास काही औरच होता. 'कलर्स मराठी'वरील कलाकारांनीही रॅलीचा उत्साह द्विगुणित केला. रॅलीचा समारोप होताच महिला-युवतींना मेडल्स आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांतील महिलांनी यात सहभाग घेत स्त्रीशक्तीचा जागर केला.

रॅलीने वेधले पुणेकरांचे लक्ष…
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सकाळी रस्त्यांवर गर्दी होती. रॅली ज्या रस्त्यांवरून जात होती त्या वेळी रॅलीने सगळ्यांचे लक्ष वेधले. दुचाकीवर स्वार झालेल्या आणि फेटा घातलेल्या महिला-युवतींना पाहून पुणेकरही आनंदित झाले. रॅलीमध्ये पोलिस बंदोबस्तही चोख दिसून आला. पुणे महापालिकेसह वाहतूक पोलिसांचे रॅलीला सहकार्य लाभले.

'पुढारी कस्तुरी क्लब'ने हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी महिलांसाठी आज काढलेल्या बाइक रॅलीने जणू नवा विक्रमच करीत घराघरांत आम्हालाही पोहोचविले. 'पुढारी' समूहाने असेच वेगवेगळे उपक्रम राबवावेत, आम्ही सोबत राहू.
                            – सुवंकर सेन, एमडी व सीईओ, सेन्को गोल्ड अँड डायमंड

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त 'पुढारी'ने स्त्रीसक्षमीकरणासाठी आयोजिलेल्या बाइक रॅलीला मिळालेला प्रतिसाद खूपच वाखाणण्याजोगे आहे. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचा उत्साह अप्रतिम होता आणि त्याला मिळालेली संगीतची साथ हे वातावरण मोहून टाकत होती. यासाठी आम्ही 'सेन्को गोल्ड अँड डायमंड'तर्फे दैनिक 'पुढारी'च्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो. रॅलीत सहभागी झालेल्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या पूर्ण भारतामध्ये 136 हून अधिक शाखा असून, पुण्यात लक्ष्मी रोड (शगुन चौक) आणि फिनिक्स मॉल येथे आमची शाखा आहे. कमी वजनाचे, उत्कृष्ट कोलकता कारागिरीचे, सोने आणि हिर्‍यांचे दागिने हे आमचे वैशिष्ट्य आहे आणि जगातील सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी आणि डिझाइन ब्रॅंड हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांनी आमच्या शाखेला नक्कीच भेट द्या.
– संजय हुंजे, विभागीय व्यवस्थापक, सेन्को गोल्ड अँड डायमंड पश्चिम-दक्षिण विभाग

'पुढारी'ने मराठी नववर्षनिमित्त काढलेली भव्य वाहन रॅली डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. यात पहिल्यांदाच सर्व वयोगटांतील महिला सहकुटुंब सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत ज्येष्ठ महिलांनी बुलेट, स्पोर्ट्स बाइक चालवत रंगत आणली. 'पुढारी'ने असे उपक्रम यापुढेही घ्यावेत.
                                                                   – सुजाता सामंत, कलर्स वाहिनी

मी मूळची देवगड जवळच्या आरेगावची. लहापणापासून दै. 'पुढारी' वाचतच मोठी झाले. जो पेपर बालपणी वाचला, त्यात माझ्या अनेक वेळा बातम्या येतात, तेव्हा खूप आनंद होतो. 'पुढारी कस्तुरी'ने घेतलेला इव्हेंट मला खूप आवडला. सर्व वयोगटांतील महिला यात सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण शहरभर रविवारी कस्तुरीचाच सुगंध दरवळला. दै. 'पुढारी' व 'कलर्स'चे खूप-खूप आभार.
                             – प्रतीक्षा मुणगेकर, अभिनेत्री ('जीव माझा गुंतला' फेम)

मी मूळची पन्हाळ्याची, त्यामुळे 'पुढारी कस्तुरी क्लब'शी जुने नाते आहे. आज निघालेल्या महिलांच्या वाहन रॅलीने खूप रंगत आणली. महिला नटूनथटून उत्साहाने सहभागी झाल्या, ते पाहून खूप आनंद वाटला. महिलांचा जोश, उत्साह पाहून मलाही ऊर्जा मिळाली. मीदेखील या वाहन रॅलीत बुलेट चालवण्याचा आनंद लुटला.
                                         -अमृता धोंगडे, अभिनेत्री ('बिग बॉस' फेम)

सकाळी-सकाळी पुण्यात आज 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने बहार आणली. साजशृंगार करून महिला बाइक रॅलीत खूप उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंदाचे उधाण आले होते. महिलांनी महिलांना मोठी ऊर्जा दिली. महिलांना नेहमी त्यागमूर्ती म्हणून समाजात भूमिका निभावावी लागते, त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम सतत दै.'पुढारी'ने घ्यावेत.
                   – रसिका वाखारकर, अभिनेत्री ('पिरतीचा वनवा उरी पेटला' फेम)

'पुढारी कस्तुरी' व 'कलर्स'ने घेतलेल्या या इव्हेंटने शहरात चैतन्य आणले.
जबराट रॅली निघाली. मला सहभागी होताना खूप आनंद झाला. रॅलीत कोल्हापुरी थाट दिसला. महिलांची नवीन क्रिएटिव्हिटी दिसली.अनेकांसोबत सेल्फी काढताना आनंद वाटला. शहरातला हा बेस्ट
इव्हेंट ठरला.
                       – इंद्रनील कामत, अभिनेता ('पिरतीचा वनवा उरी पेटला' फेम)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT