देविदास दगडू सरडे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून विजय राजेंद्र वलगे (रा. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अनिरुद्ध उर्फ निखिल रामभाऊ निंबाळकर (रा. बिटरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात 17 ऑगस्ट रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी व तोतया डॉक्टर असल्याचा आरोप असलेल्या विजय राजेंद्र वलगे यांना बुधवारी (दि. 28) अटक करण्यात आली आहे. इंदापूर न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही घटना 17 जुलै 2023 ते 26 जुलै 2023 दरम्यान घडली.
कांदलगाव येथील 7, तर इतर ठिकाणच्या एकूण 20 महिला व पुरुष विविध धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी गेल्या होत्या. सहलीदरम्यान 8 जणांना वैद्यकीय उपचारांची गरज असतानाही आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले. घटनेत मृत्यू झालेल्या शोभा सरडे यांना उपचारांची नितांत आवश्यकता असतानाही त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी विजय राजेंद्र वलगे या तोतया डॉक्टरकरवी खासगी औषधालयातील औषधांद्वारे मथुरा (उत्तरप्रदेश) येथील विश्वसेवा वृंदावन आश्रमातच वैद्यकीय उपचार करण्यात आले. परिणामी आरोग्य खालावल्याने तथा आरोपींकडून अयोग्य उपचार, तसेच योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने 26 जुलै 2023 रोजी ग्वालियर (मध्यप्रदेश) येथील जे.ए.एच. या शासकीय रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही सर्व हकीकत फिर्यादीत नमूद असून या सहलीचा आयोजक, तथा महिलेच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप असलेला दुसरा आरोपी ह.भ.प. अनिरुद्ध उर्फ निखिल रामभाऊ निंबाळकर महाराज अद्यापही फरार आहे. दरम्यान इंदापूर पोलीस या प्रकरणातील सत्य आणि तथ्य तपासत आहेत.
आरोपी विजय वलगे हा मुंगशी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे खासगी दवाखाना चालवतो. मात्र तो तोतया डॉक्टर असल्याबाबत, तथा त्याच्याकडे डॉक्टर असल्याची कोणतीही पदवी नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर त्याची चौकशी तथा त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार देखील देण्यात आली होती. मात्र संबंधितांकडून आरोपीची कोणतीही चौकशी व कारवाई न करता त्याला लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी मोकळीक दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.